जत : जत विधानसभा मतदार संघात अचानक झालेली मतदार संख्येची वाढ व मतांच्या टक्केवारीत झालेली वाढ व आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्यावर असलेले गुन्हे लपविल्याच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
जतमध्ये सावंत यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी आमदार पडळकर यांची कायदेशीररित्या कोंडी करण्याची तयारी केलेली आहे.
जत विधानसभा निवडणुकीत भाजपमधील घटबाजीला झुगारून आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही निवडणूक लढविली. यामध्ये भूमिपुत्र विरुद्ध उपरा अशी लढत झाली. या लक्षवेधी लढतीमध्ये गोपीचंद यांनी एक लाख १३ हजार ७३७ मते मिळवत विक्रमसिंह सावंत यांचा ३८ हजार ४५३ मतांनी पराभव केला. विक्रमसिंह सावंत यांना अवघी ७५ हजार मते मिळाली.दरम्यान, हा पराभव सावंत यांच्या जिव्हारी लागला. यासाठी त्यांनी दोन केंद्रांवरील फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता.
यासाठी ९४ हजार ४० रुपयांची रक्कमही भरली आहे. ती मोजणी प्रलंबित असून तत्पूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. यामध्ये जत विधानसभा मतदार संघात अचानक झालेली मतदार संख्येची वाढ व मतांच्या टक्केवारीत झपाट्याने झालेली वाढ व आ. गोपीचंद पडळकर यांनी आपल्यावर दाखल झालेले गुन्हे लपविले असल्याच्या मुद्द्यांचा समावेश आहे.