विटा : शेळकबाव (ता. कडेगाव) येथील माझी बदनामी केल्याच्या रागातून एकाने पाच जणांना बरोबर घेऊन एका गलाई व्यावसायिकाचे अपहरण करून बेदम मारहाण केली.काल्पनिक बदनामीचे प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल ५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार खानापूर तालुक्यात घडला.
याप्रकरणी अविनाश जाधव (रा. शेळकबाव, ता.कडेगाव), तुषार धनाजी मदने (रा. हिंगणगादे, ता. खानापूर), आतिष बोडरे (रा. गार्डी, ता. खानापूर) आणि चार अनोळखी व्यक्तींवर विटा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबत गलाई व्यावसायिक संदीप तुकाराम साळुंखे (वय ३४) यांनी याप्रकरणी पोलीसात फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी,हिंगणगादे येथील संदीप साळुंखे हे गेल्या काही वर्षांपासून गुजरात येथील होलीचकला (मेन बझार, फत्तेपुरा, जि. दाहोद) येथे सोने-चांदीचा गलाई व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी ते गावी हिंगणगादेस आले आहेत.
फिर्यादीत म्हटले कि, रविवारी सकाळी संदीप साळुंखे यांना संशयित अविनाश जाधव याच्या सांगण्यावरुन तुषार मदने, आतिष बोडरे याच्यासह चौघा अनोळखींनी दुचाकीवरून शेळकबाव येथे नेले. तेथे अविनाश जाधव याने संदीपला ‘तू माझी बदनामी का करतोस?, मी कोण आहे, तुला माहीत नाही’, असे म्हणून स्टीलच्या पाईपने पाठीवर, दोन्ही हातांवर, पायावर मारहाण केली.
तुषार मदने, अतिष बोडरे व त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन अनोळखींनी कमरेच्या पट्ट्याने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तेथून संदीप यांना जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या मोटारीत बसवून कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव ते हातकणंगले रस्त्याकडेला असलेल्या झाडीत नेऊन दमदाटी केली. तेथे ‘तू माझी बदनामी केली आहेस, प्रकरण मिटविण्यासाठी ५ लाख रुपये दे’ अशी मागणी अविनाश याने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.