सांगली : जिल्हा, तालुकास्तरावरील विविध सत्तावीस शासकीय कमिट्यांवर कार्यकर्त्यांना लवकरच संधी दिली जाईल. कमिट्यांवरील निवडींचा ‘महायुती’चा फॉर्म्युला ठरेल, भाजप कार्यकर्त्यांची यादी तयार ठेवा, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या बैठकीत सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी जिल्हा दौऱ्यावर होते.जिल्हा, तालुकास्तरीय विविध कमिट्या, जिल्हा नियोजन समिती, विशेष कार्यकारी अधिकारी आदी पदांवर कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे. समाजातील सर्व घटकांतील कार्यकर्त्यांना संधी दिली जावी. त्यांचे शिक्षण, त्यांची पार्श्वभूमी, पक्षाशी एकनिष्ठ या बाबीही पाहाव्यात. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांसह अन्य घटकपक्षांतील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे.
कोणत्या पक्षाला किती संधी मिळणार, याबाबत महायुतीचा फॉर्म्युला ठरेल. त्यानुसार संधी मिळेल. भाजपच्या कोणत्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे, त्याची यादी तयार ठेवा. जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. भाजपला ६० टक्क्यांहून कमी मतदान झालेल्या बुथवर लक्ष केंद्रित करा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.
नोंदणीत ‘तासगाव-कवठेमहांकाळ’ची आघाडी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेतला. जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ६५ सदस्यांची नोंदणी झाली आहे. सर्वाधिक ५४ हजार सदस्य नोंदणी तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून झाली आहे. सांगली आणि मिरज या दोन विधानसभा मतदारसंघातून एकूण ९२ हजार प्राथमिक सदस्यांची नोंदणी झाली आहे. सदस्यता नोंदणी वाढवा, अशी सूचनाही पाटील यांनी केली.