मुलीशी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जावयाला अपहरण करून मारहाण

0
283
Crime scene barricade covering. Murder case of a criminal young male.

इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर सात महिन्यापूर्वी मुलीशी आंतरजातीय विवाह केलेल्या विशाल मोहन अडसूळ (रा. भुये, ता. करवीर) या तरुणाचे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून गंभीर जखमी करणाऱ्या हल्लेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी अटक केली. दरम्यान, मिरज येथील एका खोलीत हातपाय दोरखंडाने बांधून ठेवलेल्या अवस्थेतील तरुणाची सुखरूप सुटका केली.

विशाल अडसूळ युवतीच्या वडिलांसह तीन श्रीकृष्ण महादेव कोकरे (४५, रा. वाघमोडे नगर, कुपवाड, ता. मिरज) धीरज ऊर्फ हणमंत नामदेव पाटील (५६, कवठेपिरान, ता. मिरज), राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी (३३, कुपवाड एमआयडीसी, सावळी, ता. मिरज) अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. या प्रकरणात आणखी चौघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा पोलिस शोध घेत असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. संशयितांविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण व करवीर पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विशाल अडसूळ या तरुणाचा मोठ्या संकटातून जीव वाचविल्याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलिस निरीक्षक कळमकर, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, सहायक निरीक्षक शेषराव मोरे यांच्यासह पथकाचे अभिनंदन केले. जखमी विशालची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचेही कळमकर यांनी सांगितले.

पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की निगवे दुमाला येथील मोहन शंकर अडसूळ (५६) यांचा मुलगा विशाल व संशयित श्रीकृष्ण कोकरे यांची मुलगी श्रुती यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. परिचय वाढत गेल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. या दोघांनी सात महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला. युवतीच्या वडिलांसह कुटुंबीयांना हा प्रेमविवाह पसंत नव्हता. त्यांनी विरोध दर्शवला होता. दोघांनी विरोध झुगारून प्रेमविवाह केल्याने मुख्य संशयित श्रीकृष्ण कोकरे व त्यांचे कुटुंबीय व मित्रांनी विशाल अडसूळ याला कायमच्या अद्दल घडवण्याचा निर्धार केला होता.

रविवारी (दि ९ फेब्रुवारी) रात्री नऊ वाजता विशाल याचे भुयेवाडी (ता. करवीर) येथील कमानीजवळून अज्ञातांनी मोटारीतून अपहरण केले होते. त्याचे वडील मोहन अडसुळ यांनी तातडीने करवीर पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची फिर्याद दाखल केली होती. भर चौकातून तरुणाचे अपहरण झाल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण व करवीर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. शोध सुरू असतानाच पोलिस कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांना आंतरजातीय प्रेमविवाहातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके सांगली, मिरज, कुपवाडला रवाना झाली. पथकाने अंकली येथे मुख्य संस्थेत श्रीकृष्ण कोकरे यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली. पोलिसांचा प्रसाद मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मुलीने प्रेमविवाह केल्याने विशाल अडसूळ याचे अपहरण करून त्यास मिरज येथील खोलीत कोंडून ठेवल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी खोलीवर छापा टाकला असता विशाल याला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याची सुटका करून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुख्य संशयित श्रीकृष्ण कोकरे यांच्यासह तिघांना अटक केली

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here