गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांची माहिती : सीईओ तृप्ती धोडमिसे करणार कारवाई
तासगाव : तालुक्यातील बस्तवडे येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका विद्या मिरजकर, शिक्षक दीपक माळी, दीपाली भोसले यांनी शनिवारी रजा न काढता शाळेला दांडी मारली. याप्रकरणी सर्व शिक्षकांचे जबाब घेतले आहेत. त्यांच्या कामचुकारपणाबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांच्याकडे पाठवला आहे, अशी माहिती तासगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांनी दिली. या तीनही कामचुकार शिक्षकांवर पुढील कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे करणार आहेत.
याबाबत माहिती अशी : बस्तवडे येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत 65 विद्यार्थी शिक्षण घेतात. या ठिकाणी विद्या मिरजकर या मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहेत. तर दीपक माळी व दिपाली भोसले हे सहयोगी शिक्षक म्हणून ज्ञानार्जनाचे काम करत आहेत. शनिवारी या तीनही शिक्षकांनी अधिकृत रजा न घेता शाळेला दांडी मारली होती.
सकाळी 7 वाजता विद्यार्थी शाळेत आले होते. मात्र एकाही शिक्षकाचा शाळेत पत्ता नव्हता. यापूर्वी झिरो शिक्षिका म्हणून काम केलेल्या सरिता कदम यांनी शाळा उघडली होती. दरम्यान, शाळेत शिक्षक आले नसल्याने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी गटविकास अधिकारी के. पी. माने, गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांच्याशी संपर्क साधला.
लावंड यांनी तातडीने शाळेस भेट दिली. त्यावेळी मुख्याध्यापिका विद्या मिरजकर व दीपाली भोसले या दोघीही रजा न घेता शाळेत गैरहजर असल्याचे दिसले. तर दीपक माळी हे शिक्षक सकाळी 7.20 ला शाळेची वेळ असताना तब्बल 3 तास उशिराने 10 वाजता शाळेत आले होते. सकाळी 7.20 ते 10 पर्यंत शिक्षकाविना ही शाळा सुरू होती.
अधिक चौकशी केली असता मुख्याध्यापिका मिरजकर यांच्या मुलीचा साखरपुडा असल्याने त्या तीन दिवसांपासून रजा न घेता गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला. तर दीपाली भोसले याही साखरपुड्याला कोल्हापूरला गेल्याची माहिती मिळाली. दीपक माळी हे शिक्षकही शाळा वाऱ्यावर सोडून कोल्हापूरला जायला निघाले होते. मात्र शाळेत गोंधळ उडल्यानंतर सकाळी 10 वाजता ते शाळेत उगवले.
बस्तवडे शाळेतील मुख्याध्यापिकेसह इतर शिक्षकांच्या बेफिकीरीमुळे जिल्हा परिषद शाळेतील कारभार चव्हाट्यावर आला आहे. काही महिन्यांपूर्वी निमणी येथील शाळेत झिरो शिक्षक नेमून संघटनेचे काम करत फिरणाऱ्या अविनाश गुरव यांना निलंबित केले आहे. मात्र या कारवाईनंतर तालुक्यातील शिक्षकांच्या कारभारात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, बस्तवडे शाळेतील कामचुकार शिक्षकांचे जबाब घेण्यात आले आहेत. याबाबत गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांच्याकडे आज अहवाल पाठवला आहे. त्यामुळे कामचुकार शिक्षकांवर येत्या दोन दिवसात कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे या कारवाईबाबत निर्णय घेणार आहेत.