जत : श्री.मायाक्कादेवीच्या नावांन उदं उदं,कानड्या लाडीच्या नावांन उदं उदं च्या जयघोषात श्री.क्षेत्र चिंचली मायाक्कादेवीला लाखो भाविक भक्तांनी महानैवैध्य दाखवून देवीचे दर्शन घेतले.
श्री.महाकाली देवीचा अवतार असलेल्या श्री.क्षेत्र चिंचली मायाक्का देवीचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील चिंचली येथे कृष्णा नदिच्या जवळ आहे. चिंचली मायाक्का देवी हे क्षेत्र जागृत तीर्थक्षेत्र असून दरवर्षी या देवीची मोठी यात्रा भरते.
किल्ली आणी किट्टी या दैत्यांचा देविने संहार केल्यानंतर देवीने या नदीत स्नान केले.त्यानंतर देवीच्या अंगावर पडलेले दैत्यांचे रक्त नदिच्या पाण्यात पडले व त्या पाण्याचे दूध होऊन वाहू लागल्याने या नदीला हल्ल्याळ (दुधाची गंगा) असेही म्हंटले जाते.यावर्षीही चिंचली मायाक्का देवीची यात्रा मोठ्याप्रमाणात भरविण्यात आली असून यात्रेला विविध राज्यातून भाविकभक्त मोठ्या संख्येने आले होते.
रविवारी श्री.मायाक्का देवीला बोणी,महानैवैद्य दाखविण्याचा व देवीची पालखी व सबीना नगरप्रदक्षीणेचा असल्याने शनिवारी रात्रीपासूनच भाविकभक्त हल्ल्याळ ( दूधगंगा ) नदीत स्नान करून आपल्याबरोबर यात्रेला जाताना नेण्यात आलेले देवा-ह्यातील देव व मंदिरातील मूर्तींना हल्ल्याळ नदीत स्नान घालण्यात आले.त्यानंतर त्यांची पूजा व आरती करून नैवेद्य दाखविण्यात आला.
यानंतर घागरीत नदीचे पाणी घेऊन ते पाणी पालखी तळावर आणून त्या पाण्याने देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार करण्यात आला.
जत येथील श्री.मायाक्कादेवी देवी व श्री.भाग्यवंती देवीचे पुजारी श्री.बसवराज अलगुर महाराज व सौ.सुवर्णाताई अलगूर यांनीही आपल्यासोबत श्री.क्षेत्र चिंचली येथे पालखी रथयात्रा नेऊन पालखीतील श्री.मायाक्कादेवी व श्री.भाग्यवंती देवी यांच्या मूर्तीस हल्ल्याळ नदीत स्नान घातले व देवीची आरती व पूजा केली.
त्यानंतर देवीच्या पालखीरथाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.श्री.चिंचली मायाक्कादेवीच्या पालखीची व घोड्याची व नंदीची ही मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली.
ढोल,ताशाच्या निनादात ही पालखी मंदिराच्या दिशेने निघते.यावेळी मंदिरात जाऊन मंदिराला प्रदक्षीणा घालून आतमध्ये जाऊन देवीची भेट घेऊन देवीची ओटी भरून नैवेद्य अर्पण करून आतमध्ये पाचफे-या घालून बाहेर आल्यानंतर किल,किट्ट येथील दूध डे-याला भेट देऊन तिथे आणलेली वारी किल,कटटीला अर्पण केले जाते.
त्यानंतर पुन्हा राहात्या जागेवर येऊन तिथे दुपारी सुवासिनी व गण यांना आरती करून त्यांना पुरणपोळीचा प्रसाद जेवणासाठी दिला जातो. त्यानंतर पालखी दर्शनासाठी येणा-या भक्तांना पुरणपोळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येते.यावेळी श्री.मायाक्का देवी व श्री.भाग्यवंतीदेवीचे पुजारी श्री.बसवराज अलगुर महाराज यांचा श्री.चिंचली देवस्थानच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष श्री.जितेंद्र राव राजोजीराव देसाई उर्फ जाधव यांनी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.