जिल्हाधिकारी अशोक काकडे : ‘भूपाळी ते भैरवी’ने तासगावकर भारावले
तासगाव : राजकारणात येऊनही शेवटच्या घटकाचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सुटेपर्यंत स्वस्थ न बसणारा निष्कलंक चेहरा म्हणजे स्व. आर. आर. पाटील होत, असे गौरवद्गार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काढले.
तासगाव येथे स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आमदार रोहित पाटील कल्चरल ग्रुप व जिव्हाळा सोशल फाऊंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार रोहित पाटील, तहसीलदार अतुल पाटोळे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, आमदार रोहित पाटील कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष व तासगाव मार्केट कमिटीचे माजी चेअरमन रवींद्र पाटील उपस्थित होते. यावेळी आयोजित ‘भूपाळी ते भैरवी’ या लोकगीतांच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाच्या भावछटा बघून तासगावकर भारावून गेले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, स्व. आर. आर. पाटील यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले. मी निवासी उपजिल्हाधिकारी असताना त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. तासगाव – कवठेमंकाळच्या दुष्काळ हटवण्यासाठी ते किती जागृत होते, याची असंख्य उदाहरणे देता येतील. दुष्काळात टँकरचे पाणी व शेवटच्या घटकातील लोकांच्यासोबत त्यांचे असलेली नाळ यावेळी मला दिसून आली. सामान्य लोकांच्या प्रश्न तळमळीने मांडताना मी त्यांना पाहिले. राजकारणात राहूनही आपली स्वच्छ प्रतिमा त्यांनी आयुष्यभर जपली म्हणून ते सर्वसामान्यांचे झाले, असे सांगत त्यांनी या व्याख्यानमालेचे कौतुक केले.
आमदार रोहित पाटील म्हणाले, व्याख्यानमालेच्या माध्यमातून चांगला विचार मिळतो. स्व. आर. आर. पाटील त्यांच्या कामाची पद्धत व त्यांचा विचार आपण सर्वांनी मिळून पुढे नेऊया. चांगले पेरले तर चांगले उगवेल, या मताचा मी असून यासाठी आपण आत्ताच पेरणी करण्याची गरज आहे.
यावेळी सूर्योदयाची चाहूल देत गाव जागवणारी मंजूळ स्वरसाजाची भूपाळी, ज्योतिषातून गावाचे समुपदेशन करणारा पिंगळा, जात्यावरील गीते गात कौटुंबिक सौख्याची महती सांगणाऱ्या गृहिणी यापासून ते भक्तिरंगात रमणारे, कीर्तनात दंग होणारे वारीतील वारकरी… अशा ग्रामीण जीवनाच्या विविध भावछटा ‘भूपाळी ते भैरवी’ या लोकगीत- संगीत- नृत्य मैफलीतून उलगडल्या.
ग्रामीण जीवनातील सकाळची अंगणातील सडा-रांगोळी, पाणी भरणे, दूध दुभत्याची सुबत्ता, शेतीकामाच्या लगबगीपासून ते एकमेकांना भेटताना नमस्कार करीत गावगाड्यातील दिवस सुरू झाला. त्याचा संकेत दर्शविणाऱ्या भावछटा नृत्य व अभिनयाद्वारे सादर होताना मैफलीत रंगत भरली. त्याबरोबर कुडमुड्याचा आवाज काढत आलेला पिंगळा घराघराच्या अंगणात जाऊन चार समजुतीच्या गुजगोष्टी सांगू लागला; तर भरदुपारच्या उन्हात रुबाबात फिरणारा बहुरूपी छोट्या-मोठ्या नाटुकलीतून गमती-जमतीने गावाचे मनोरंजन करू लागला. तशी मैफल पुढे सरकताना शेती-पाण्याचे महत्त्व सांगत आलेला नंदीबैलवाला शेती पिकविण्यासाठी पावसाला साद घालत भाव खाऊन गेला.
खड्या आवाजात आबालवृद्धांना साद घालत कडक लक्ष्मी मध्येच अवतरली. ढोलकाच्या कडाडण्यातून प्रबोधन करून गेली. ढोलाच्या ठेक्यावर नृत्याचा फेर धरणाऱ्या धनगरी मेळ्याने सांघिक कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले. निसर्गाच्या कुशीत आनंदी जीवन जगण्याचा सुखद मार्ग आदिवासी नृत्याने दाखविला. कोळी नृत्याने समुद्राच्या लाटांशी हितगूज केले.
प्रत्येक लोकगीताला सुरेल स्वरसाज व वाद्यांचा तालबद्ध ठेका पकडून कलावंतांनी केलेल्या प्रत्येक नृत्याने टाळ्यांची दाद मिळवली.या बहारदार मैफिलीने तासगावकर भारावून गेले.