– व्यसन दुष्परिणाम परिपाठामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा
– व्यसनमुक्तीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन
– तंबाखूजन्य व प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी दक्ष राहा
सांगली : व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थी दशेतच जनजागृती करण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षकांनी प्रबोधन करावे. मुलांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती होण्यासाठी शिक्षकांना दूरदृष्य प्रणालीव्दारे माहिती द्यावी व याबाबतचा परिपाठ प्रत्येक शाळेत दिनांक 20 फेब्रुवारी व 11 मार्च 2025 रोजी आयोजित करावा. या परिपाठामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. कोणीही व्यसनाला बळी पडू नये या दृष्टीने एक सामाजिक कार्य म्हणून सर्वांनी आपले सक्रिय योगदान द्यावे, तसेच प्रबोधन, परिवर्तन व पुनर्वसन या पध्दतीने सांगली जिल्हा व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या नार्को समन्वय (एनकॉर्ड) समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, सहायक आयुक्त (औषधे) जयश्री सवदत्ते, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, औषध निरीक्षक राहुल करंडे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मुले ही देशाचे भविष्य आहेत. एक चांगला समाज घडविण्यासाठी लहान वयापासूनच मुलांना व्यसनापासून दूर ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. या दृष्टीने शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती होण्यासाठी प्रयत्न करावेत. यामध्ये शिक्षकांबरोबरच व्यसन मुक्ती केंद्राच्या स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. शासकीय अधिकाऱ्यांनीही यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. व्यसनमुक्ती केंद्रातील स्वयंसेवी संस्थांकडून व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत व व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने चित्रफीत उपलब्ध करून घेवून त्या प्रत्येक शाळेत दाखवाव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अन्न व औषध प्रशासन विभागानेही मेडिकल असोसिएशनसोबत तात्काळ बैठक घेऊन प्रत्येक औषध दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना द्याव्यात. त्याचबरोबर प्रत्येक औषध दुकानदारांना सीसीटीव्ही लावण्याबाबत पत्राव्दारे सूचित करावे. शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात 100 मीटरच्या आत तंबाखूजन्य व प्रतिबंधित पदार्थांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, यासाठी नियमितपणे तपासण्या सुरू ठेवाव्यात, असे त्यांनी सूचित केले.
एमआयडीसी कार्यक्षेत्रातील सर्व बंद व चालू उद्योगांची तपासणी नियुक्त केलेल्या तपासणी पथकांकडून सत्वर पूर्ण करावी, असे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, उद्योगांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्याबाबत, परवानगी घेतलेलाच उद्योग सुरू असल्याबाबत व उद्योगाच्या जागेत कोणतेही बेकायदेशीर कृत्य किंवा उत्पादन होत नसल्याबाबत सर्व प्रत्येक उद्योग प्लॉटधारकांकडून हमीपत्र घ्यावे. याबाबतीत संबंधितांना तात्काळ नोटीस देवून याबाबतची माहिती संकलित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेण्याबाबत नोटीस तात्काळ बजावावी, असे सांगून पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, शाळा कॉलेजच्या 100 मीटर परिसरात पानटपरी असेल ते अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देवू. त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह असेल तर त्याची तपासणी करावी. शाळेत पालकांच्या मेळाव्यामध्ये व्यसनाच्या दुष्परिणामाबत जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी मागील बैठकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा सादर करून प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी ठेवण्याबाबत सूचना केली. याबाबत तशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना देण्याबाबत सूचित करण्यात आले.