आमदार रोहित पाटील यांनी तासगावात आमसभा घ्यावी, अन्यथा आमरण उपोषण

0
5

शेतकरी नेते जोतिराम जाधव यांचा इशारा : गेल्या तीन – चार दशकात आमसभाच झाली नसल्याचा आरोप

तासगाव : गेल्या तीन-चार दशकात तासगाव पंचायत समितीच्या माध्यमातून आमसभाच झाली नाही. त्यामुळे देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून मिळवणाऱ्या रोहित पाटील यांनी तासगाव येथे आमसभा घ्यावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा शेतकरी नेते जोतीराम जाधव यांनी दिला आहे.

तासगाव तालुक्यात समस्यांचा डोंगर उभा आहे. गेल्या तीन-चार दशकात सामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. शेजारील पलूस, खानापूर, कडेगाव हे तालुके तासगाव तालुक्याच्या पुढे चालले आहेत. तासगाव तालुक्यात सहकाराला घरघर लागली आहे. गोरगरीब, कष्टकरी तरुणांच्या हाताला काम नाही. नेते म्हणून मिरवणाऱ्यांनी गेल्या तीन-चार दशकात कोणतेही उठावदार काम केले नाही. परिणामी बेरोजगारी व त्यातून गुन्हेगारी वाढत चालली आहे.

सामान्य लोकांच्या अनेक अडचणी आहेत. शासकीय कार्यालयात गोरीगरिबांची दखल घेतली जात नाही. छोट्याशा कामासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. सर्वसामान्य लोकांच्या अडचणींकडे बघायला आमदार – खासदारांना वेळ नाही. तासगाव तालुक्यातील प्रशासन मुजोर बनले आहे. अधिकारी मुर्दाड झाले आहेत. सामान्य लोकांना किड्या – मुंग्यांसारखी वागणूक दिली जाते.

तालुक्यातील लोकांना त्यांच्या प्रश्नांवर आवाजही उठवता येत नाही. एखाद्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास शासकीय यंत्रणेचा दबाव टाकून संबंधितावर गुन्हे दाखल केले जातात. सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे तालुक्यातील मूलभूत प्रश्नांवर कधी चर्चा झालीच नाही. परिणामी सर्वच बाबतीत तालुक्याची पिछेहाट होत आहे.

महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये त्या – त्या ठिकाणचे आमदार सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमसभा घेतात. तासगाव तालुक्यात मात्र गेल्या तीन-चार दशकात एकदाही आमसभा घेण्याचे धाडस येथील आमदारांनी दाखवले नाही. स्व. आर. आर. पाटील हे अनेक वर्षे या तालुक्याचे आमदार राहिले आहेत. त्यांच्याकडे गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री, उपमुख्यमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे होती. मात्र आमसभा घेऊन सामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही. त्यांच्या पश्चात सुमन पाटील यांनीही आमसभा घेण्याकडे डोळेझाक केली. परिणामी तासगाव तालुक्यातील समस्यांवर कधी चर्चाच झाली नाही.

सध्या देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील महाराष्ट्रभर मिरवत आहेत. सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांना धूळ चारून त्यांनी अवघ्या 25 व्या वर्षी विधानसभेत ‘एन्ट्री’ केली आहे. तरुण आमदार म्हणून त्यांच्याकडून मतदार संघाच्या अनेक अपेक्षा आहेत. बेरोजगारी, शेती, पाणी यासह अन्य मूलभूत गरजा आमदार म्हणून त्यांना पूर्ण कराव्या लागणार आहेत. 

याशिवाय तासगाव येथे आमसभा घेण्याचे ‘शिवधनुष्य’ही आमदार रोहित पाटील यांना उचलावे लागणार आहे. गेल्या तीन-चार दशकात तासगावात आमसभा घेण्याचे धाडस कोणीही दाखवले नाही. परिणामी सामान्य लोकांच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आमसभा घ्यावीच लागणार आहे. आमदार रोहित पाटील यांना आमसभेपासून पळ करता येणार नाही. त्यांनी लोकांच्या प्रश्नांची भिडले पाहिजे.

दरम्यान, आमदार पाटील यांनी तासगाव येथे तातडीने आमसभा घ्यावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा शेतकरी नेते जोतिराम जाधव यांनी दिला आहे. त्यामुळे आमसभेसाठी चक्क आमरण उपोषणाचे पाऊल उचलले जात असताना तरी रोहित पाटील आमसभा घेण्याचे धाडस दाखवणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here