येथील एका फार्मसी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शासकीय विश्रामगृहात धिंगाणा घातला. दारू ढोसून या विद्यार्थ्यांनी विश्रामगृहात अक्षरशः आज धुडगूस घातला. या प्रकाराची बातमी ‘व्हायरल’ होताच संबंधित विद्यार्थ्यांनी विश्रामगृहाचे भाडेही न देता पलायन केले.
याबाबत माहिती अशी : येथील एका फार्मसी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा आज मेळावा होता. या मेळाव्यासाठी बार्शी येथून आलेल्या एका माजी विद्यार्थ्याने कालच येथील शासकीय विश्रामगृह आरक्षित केले होते. तेथील एका आमदारांचा संदर्भ देऊन त्याने विश्रामगृह आरक्षित केले होते. त्याला कक्ष क्र.1 ही रुम देण्यात आली होती.
दरम्यान, आज सकाळपासून त्या माजी विद्यार्थ्याने बीड, तासगाव व पलूस भागातील आपल्या बेवड्या मित्रांना संपर्क केला. हे सर्वजण फार्मसीचे माजी विद्यार्थी आहेत. ही सगळी मंडळी शासकीय विश्रामगृहावर एकत्रित आले. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर बऱ्याच दिवसांनी सगळे मित्र एकत्रित आल्याने सर्वांनी ‘आज कुछ तुफानी करते है’ असे म्हणत दारू ढोसण्याचे नियोजन केले.
त्यानंतर मित्रांनी चक्क शासकीय विश्रामगृहावर इंग्लिश दारू आणली. दारूच्या बाटल्या फोडून सर्वांनी ‘चिअर्स’ म्हणत खंबेच्या – खंबे रिचवले. विश्रामगृहाचे दार बंद करून हा त्यांचा ‘कार्यक्रम’ सुरू होता. जसजशी रंगत चढेल तसतसे प्रत्येकाच्या अंगात येऊ लागले. शरीरात दारू भिनल्याने बेभान होऊन हे माजी विद्यार्थी रंगात आले.
दारू ढोसल्यानंतर या विद्यार्थ्यांनी अक्षरशः धिंगाणा घालायला सुरुवात केली. त्यांनतर दारूच्या नशेतच हे विद्यार्थी कॉलेजवर गेले. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच ‘ब्रेकिंग’ ‘व्हायरल’झाली.बातमी ‘व्हायरल’ होताच माजी विद्यार्थ्यांच्या मित्रांनी विश्रामगृहातून पलायन केले. जाताना त्या माजी विद्यार्थ्याने विश्रामगृहाचे भाडेही दिले नसल्याचे समोर आले आहे.
मुळात हे शासकीय विश्रामगृह येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली आहे. केवळ एकजणाच्या नावाची परवानगी काढून अनेक तळीराम विश्रामगृहात दारू ढोसून धिंगाणा घालत असतील तर अशा प्रकारावर आळा घालणे गरजेचे आहे. बाहेरगावहून येणाऱ्या मोजक्या लोकांसाठी हे विश्रामगृह असते. मात्र आमदारांच्या पत्राचा गैरवापर करून अशा प्रकारे विश्रामगृह मिळवून त्यामध्ये नको ते उद्योग करणाऱ्यांना यापुढेही जरब बसवण्याची आवश्यकता आहे.