पहिली ते सातवी शाळा, 136 विद्यार्थी अन् केवळ 3 शिक्षक | कशी आहे सांगली जिल्ह्यातील शाळाची स्थिती

0
77

शिक्षणाच्या नावानं चांगभलं*

तासगाव : तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाच्या नावानं चांगभलं सुरू असल्याचं दिसून आलं. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात 136 विद्यार्थी शिक्षण घेतात.आज दिवसभर या विद्यार्थ्यांची जबाबदारी फक्त 3 शिक्षकांवर होती. मुख्याध्यापक शाळा तपासणीला गेले होते. तर दोन शिक्षक ट्रेनिंगला होते. एक शिक्षिका इतर शाळेत शिकवण्यासाठी गेल्या होत्या.तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी या सगळ्या कारभाराचा आज पंचनामा केला.

       

तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा कारभार अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निमणी शाळेतील झिरो शिक्षिका प्रकरण आणि बस्तवडे शाळेतील रजा न घेता शिक्षकांच्या ‘दांड्या’ जिल्हाभर गाजत आहेत. निमणीप्रकरणी अविनाश गुरव व इतरांचे निलंबन झाले आहे. तर बस्तवडे प्रकरणी कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या टेबलवर आहे. 

     

 तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असताना वडगाव जिल्हा परिषद शाळेचा कारभार आज चर्चेत आला. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. त्यामध्ये 136 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर मुख्याध्यापकांसह 7 शिक्षक याठिकाणी अध्यापनाचे काम करतात. आज (शुक्रवारी) शाळेत 129 विद्यार्थी उपस्थित होते. 

       

या विद्यार्थ्यांची जबाबदारी केवळ 3 शिक्षकांवर होती. एकूण 7 शिक्षकांपैकी मुख्याध्यापक मोहन सौंदडे हे अंजनी येथे शाळा तपासणीसाठी गेले होते. सतीश पवार व आशिष उनउने हे शिक्षक ट्रेनिंगसाठी गेले होते. तर शशिकला गायकवाड या लोकरेवाडी येथील वस्ती शाळेवर शिकवण्यासाठी गेल्या होत्या. उर्वरित 3 शिक्षकांवर 129 विद्यार्थ्यांची जबाबदारी होती.

     

 दोन – दोन वर्ग एकत्रित करून हे तीन शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना अडवण्याचे काम करीत होते. शिक्षणाचा अक्षरशः बोऱ्या उडाला होता. मी माहिती मिळताच तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी शाळेत भेट दिली. त्यावेळी शाळेत सगळा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

     

संजय पाटील व प्रवीण पवार यांनी याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांच्याकडे तक्रार केली. लावंड यांनी केंद्रप्रमुख अमोल केंगार यांना तातडीने वडगाव शाळेत पाठवले. तोपर्यंत मुख्याध्यापक मोहन सौंदडे हेही शाळेत धावत – पळत आले. यावेळी केंद्रप्रमुख केंगार व मुख्याध्यापक सौंदडे यांना संजय पाटील व प्रवीण पवार यांनी धारेवर धरले. केवळ 3 शिक्षकांवर 129 विद्यार्थ्यांची जबाबदारी देऊन शिक्षणाचा खेळखंडोबा करता काय, असे म्हणून जाब विचारला.

       

यावेळी महिला शिक्षक गायकवाड यांना केवळ तोंडी सुचनेने लोकरेवाडी शाळेत पाठवल्याचे चव्हाट्यावर आले. या शाळेत सगळा मनमानी कारभार सुरू होता. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना विश्वासात घेतले नव्हते. शिवाय शाळेत शिक्षक कमी असताना मुख्याध्यापक सौंदडे यांनीही शाळा तपासणी पुढे ढकलायला पाहिजे होती. मात्र हजारोंचे पगार घेणारे शिक्षक याठिकाणी केवळ दिवस भरवण्याचे व पाट्या टाकण्याचे काम करत असल्याचे दिसून आले.

       

याप्रकरणी संजय पाटील व प्रवीण पवार कमालीचे आक्रमक झाले. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचा पगार मिळतो. ट्रेनिंग व अन्य शाळाबाह्य कामे सुटीदिवशी पूर्ण करावीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये, अशी भूमिका पाटील व पवार यांनी घेतली. त्यांनी या सगळ्या कारभाराबाबत शेरा पुस्तकात नोंद केली आहे.

… तर सोमवारपासून शाळा चालू देणार नाही : संजय पाटील*

       

राज्यभर शिक्षणाच्या नावानं चांगभलं सुरू आहे. हजारोंचा पगार घेणारे शिक्षक ट्रेनिंग व शाळाबाह्य कामात अडकून पडले आहेत. विद्यार्थी वाऱ्यावर आहेत. कोणाचा कोणाला पायपोस नाही. शिक्षकांवर कोणाचा दबाव नाही. त्यांना विचारणारे कोण नसल्याने ते निर्ढावले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. गोरगरिबांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. मात्र शासनाला या मुलांच्या गुवत्तेचं काही पडलं नाही. पण यापुढे सर्व शिक्षक हजर असतील तरच शाळा सुरू ठेवावी. शाळेला सुट्टी देऊन एकदाच ट्रेनिंग पूर्ण करून घ्यावीत किंवा सुटीदिवशी ट्रेनिंग घ्यावीत, अन्यथा सोमवारपासून शाळा चालू देणार नाही, असा इशारा तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील यांनी दिला आहे.

*

नेमणुकीच्या ठिकाणी न राहता घरभाडे घेणारे गुरुजी..!

     

तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी राहत नाहीत. केवळ बोटावर मोजण्याइतके शिक्षक जे परजिल्ह्यातील आहेत तेच नेमणुकीच्या ठिकाणापासून आसपास राहतात. बहुतांशी शिक्षक आपापल्या घरी अथवा तालुक्याच्या ठिकाणी राहतात. मात्र हे सगळेच शिक्षक दर महिन्याला हजारो रुपयांचे बोगस घरभाडे घेतात, असे दिसून आले आहे. सर्वसामान्य लोकांनी कररूपी भरलेल्या पैशांची ही लूट आहे. ती थांबली पाहिजे, असे संजय पाटील म्हणाले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here