यावर्षी देशभर कडाक्याची थंडी पडेल अशी शक्यता असताना म्हणावी तशी थंडी पडली नाही. भारताच्या उत्तर भागात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात कडाक्याची थंडी पडली. जानेवारीमध्ये तर सर्व शहरांचे तापमान नीचांकी स्तरावर पोहचले मात्र महाराष्ट्रात कडाक्याची थंडी अभावानेच पाहायला मिळाली. जानेवारी महिन्यात काही ठिकाणी थंडी पडली मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी गायब झाली आणि उष्णता वाढली. १९०१ नोंदीनुसार सरासरीपेक्षा अधिक किमान तापमानात यंदाचा फेब्रुवारी महिना प्रथम क्रमांकावर आहे. फेब्रुवारी महिन्यात देशात १५.०२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यातच फेब्रुवारी महिन्याचे सरासरी कमाल तापमान २९.०७ देखील दुसऱ्या सर्वोच्च पातळीवर होते. सध्या तर अतिशय विचित्र प्रकारचे हवामान अनुभवयास मिळत आहे. सकाळी गार वाऱ्यांसह कडाक्याची थंडी असते तर दुपारी कमालीचे गरम होते.
काही शहरांचे सकाळचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते तर दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असते. राज्यातील सर्वच शहरात जवळपास हेच तापमान आहे. सकाळी हुडहुडी भरणारी थंडी तर दुपारी घामाच्या धारा. वातावरणातील या बदलाने अनेकांचे आरोग्य बिघडले आहे. वातावरणातील या बदलाने थंडी, खोकला आणि सर्दीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. लहान मुलांमध्ये तर थंडी तापाची साथच आली आहे. आता आपण मार्चच्या सुरुवातीस असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होऊ शकते. हवामान खात्याने तर तसा अंदाजच वर्तवताना सांगितले आहे की आगामी काळात उष्णतेच्या प्रमाणात वाढ होणार आहे.
याशिवाय तापमानातील चढ उतार कायम राहणार आहे. इतकेच नाही तर अधूनमधून वाहणाऱ्या उष्णतेतही चढउतार होऊ शकेल. हवामान खात्याने वर्तवलेली ही शक्यता चिंताजनक आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या सौम्य ला निना स्थिती असून लवकरच अल निनोचा पॅटर्न तयार होणार आहे. तज्ज्ञांच्या मते भारतात यावर्षी मागील वर्षापेक्षा अधिक उष्णतेची लाटा येऊ शकतात. मार्च ते मे महिन्यात या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसू शकतो. मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात उष्णतेच्या लाटेचे प्रमाणही जास्त राहू शकते असा इशाराही भारतीय हवामान विभागाने दिला आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात देशात अल निनोचा प्रभाव दिसून येईल. असेही हवामान खात्याने सांगीतले आहे मात्र उष्णतेच्या लाटेच्या शक्यतेने सर्वांची चिंता वाढवली आहे.
मागील वर्षीही उष्णता मोठया प्रमाणात वाढली होती मात्र यावर्षी उष्णतेच्या लाटेचे प्रमाण अधिक असल्याने चिंता अधिक वाढली आहे. मागील वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. राज्यातील पाणी साठा कमी होत असताना तीव्र उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात जमिनीचा ओलावा कायम राखून पिके जागवण्यासाठी धरणांच्या पाण्याचे नियोजन सरकारी पातळीवर वेळीच करणे गरजेचे आहे. दिवसा आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने विजेचा वापर अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात विजेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. परीक्षांचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांनाही काळजी घ्यावी लागणार आहे. अल निनोच्या प्रभावाने जगभर वातावरणात बदल होत आहे. जगात एकाच वेळी वेगवेगळे हवामान पहावयास मिळत आहे. जगात कुठे उष्णतेची लाट अनुभवयास मिळते तर कुठे प्रचंड पाऊस पाहायला मिळतो तर कुठे कडाक्याची थंडी अनुभवयास मिळत आहे. अल निनोचा प्रभाव भारतासह जगातील सर्वच देशांवर पडत असल्याने केवळ भारताचीच नव्हे तर संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५