महेश लोखंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल : घरात घुसून कपडे फाडून केला अत्याचार
तालुक्यातील हातनूर येथील एका २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी महेश सुरेश लोखंडे याच्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश याने पीडित तरुणीचा गाऊन फाडून तिच्याशी लगट करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत माहिती अशी : संशयित महेश लोखंडे हा पीडित तरुणीच्या शेजारी राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो तिला वॉट्स अँपवर मेसेज पाठवून त्रास देत होता. 'तू माझ्यासोबत फिरायला येतेस का. तू मला आवडतेस. मी तुला आवडतो का. मला होय म्हणणार का,' अशी विचारणा करत होता. त्याला संबंधित तरुणीने स्पष्टपणे नकार दिला होता. त्यामुळे महेश हा चिडून होता. त्याने 'तुला दाखवतो. कसा बदला घेतो बघ' अशी धमकी दिली होती.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ९ वाजता महेश लोखंडे हा संबंधित तरुणीच्या घरात घुसला. त्यावेळी तरुणी घरात एकटीच होती. त्यावेळी महेश याने 'तू मला आवडतेस. मला नकार का दिलास' असे म्हणून हात पिरगाळत तरुणीला शिविगाळ केली. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत महेश याने पीडित तरुणीचा गाऊन फाडला. यावेळी तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर महेश पळून गेला.
याप्रकरणी मंगळवारी पीडित तरुणी व तिची आई महेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी पीडित तरुणी जे सांगत होती तशी फिर्याद दाखल करुन घेतली नाही. शब्दांचा खेळ करत जे घडलेच नाही असा प्रकार नोंदवत अदखलपात्र गुन्हा दाखल करुन घेतला.
यानंतर बुधवारी पुन्हा संबंधित तरुणी व तिच्या आईने पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेतली. त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. महेश याने फाडलेला गाऊन दाखवला. यानंतर वाघ यांनी याप्रकरणी विनयभंगाची फिर्याद दाखल करुन घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानंतर बुधवारी सायंकाळी याप्रकरणी महेश लोखंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे करीत आहेत.