*चिंचणी, मनेराजुरीच्या चौघांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल : टोळक्याच्या मुसक्या आवळण्याची मागणी*
तालुक्यातील हातनूर येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा चारचाकी गाडीने पाठलाग करून तिची छेड काढण्यात आली. याप्रकरणी चिंचणी, मनेराजुरी येथील चौघांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मस्तवाल टोळक्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी केली आहे.
सुयोग संतोष वाळवेकर, ओंकार विजय झांबरे (दोघेही रा. मनेराजुरी, ता. तासगाव), स्वप्नील उदय पाटील, सुमित संजय पाटील (दोघेही रा. चिंचणी, ता. तासगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी : हातनूर येथील एक विद्यार्थिनी तासगाव येथे अकरावीला विज्ञान शाखेत शिक्षण घेते. शिवाय ती एका अकॅडमीतही शिक्षण घेते. ती दररोज सकाळी 6.30 वाजता तासगावला येते व दुपारी 2.30 च्या दरम्यान घरी जाते. आज मंगळवारी ती आपला क्लास संपवून दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घरी जाण्यासाठी निघाली होती.
तासगाव – खानापूर बसने ती हातनूरला जात होती. ही बस गोटेवाडी फाटीवर थांबली असता लाल रंगाची स्विफ्ट गाडी त्या ठिकाणी थांबल्याचे दिसले. मात्र गाडीच्या सगळ्या काचा पूर्ण काळ्या असल्याने त्यामध्ये कोण बसले होते, हे समजले नाही.
त्यानंतर सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान ही बस हातनुर येथे पोहोचली. त्यानंतर ही विद्यार्थिनी एकटीच आपल्या मळ्याकडे चालत चालली होती. त्यावेळी गोटेवाडी फाटीवर असणारी तीच लाल रंगाची स्विफ्ट गाडी तिचा पाठला करत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, गाडीच्या चालकाने संबंधित विद्यार्थिनीच्या समोर गाडी आणून, गाडीच्या काचा खाली घेऊन मोठ्याने हॉर्न वाजवला. शिवाय गाडीतील टोळक्याने तिच्याकडे एकटक पाहून तिची छेड काढली. संबंधित विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांनी लागलीच आपल्या गावातील एका मित्राला या गाडीचा नंबर पाहावयास सांगितला. त्यावेळी गाडीचा नंबर 246 असल्याचे समजले.
त्यानंतर या गाडीचा पूर्ण नंबर घेण्यात आला. तो एम. एच. 10, ई. ई. 0246 असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, चौकशीनंतर या गाडीत सुयोग वाळवेकर, ओंकार झांबरे, स्वप्नील पाटील व सुमित पाटील हे असल्याचे समजले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने तासगाव पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून या टोळक्याविरोधात पोक्सो व विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान संबंधित टोळक्याने तासगावपासून हातनूरपर्यंत या विद्यार्थिनीचा पाठलाग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मस्तवाल टोळक्याच्या मुसक्या आवळ्यात, अशी मागणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी केली आहे.




