मुंबईतील उपायुक्तांनी दिली अचानक भेट; सेविकांचे कौतुक
जत :तालुक्यातील सनमडीजवळील नरळेवाडी हे ऊसतोड मजुरांचे गाव. वाडीवर तसा शिक्षणाचा गंधच नाही त्यात अंगणवाडीला मुले पाठवली तर घर राखायचे कोण हा मूळ प्रश्न. अशा स्थितीत अंगणवाडी सेविका धनश्री कांबळे-जाहीर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडीचे रुपडे पालटण्याचा संकल्प केला त्यास मदतनीस जया घाडगे यांच्यासह ग्रामस्थ व पालकांनी मोलाची साथ दिली.
तालुक्यातील आदर्श अंगणवाडी ओळखली जाते. व्यखल्ली चिमुकला शाळेकडे फिरकत नव्हता. अंगणवाडी सेविका धनश्री कांबळे-जाहीर यांनी पालकांना महत्व पटवून सांगितले.लोकसहभागातून अंगणवाडीचे सुशोभीकरण करण्यात आले. संपूर्ण इमारतीचे रंगकाम करण्यात आले. उमेद – अंगणवाडी सनमडी (नरळेवाडी) हे नाव सर्वांचे लक्ष वेधून घेवू लागले. अंगणवाडीत मुलांना बसायला मॅट तसेच हवे ते शैक्षणिक साहित्य मुलांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. अंगणवाडीच्या भिंती पेंटर राज धायगुडे यांनी बोलक्या केल्या. बोलक्या भिंती मुलांना बरेच काही सांगून जातात. अंगणवाडीचा परिसर, स्वयंपाक घर, शौचालय स्वच्छ ठेवण्यात आल्याने मुलांना बालपणीच स्वच्छतेचे घडे नकळत दिले जात आहेत.
शासनाकडून शाळेसाठी अनेक साहित्य उपलब्ध करून दिले जाते पण त्याचा वापर बहुतांश वापर होताना दिसून येत नाही पण नरळेवाडी अंगणवाडीत त्याला अपवाद आहे. स्मार्ट टीव्ही ते सर्व शैक्षणिक साहित्याचा वापर करून मुलांना शिकवले जाते. सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. विविध उपक्रम राबविले जातात.मुलांच्या जेवणाकडे विशेष लक्ष दिले जाते.
अचानक भेट व कौतुकाची थाप सनमडी नरळेवाडी केंद्र क्र. ८ अंगणवाडीस एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे राज्याचे उपायुक्त विजयमाला माने यांनी अचानक भेट दिली. या अचानक भेटीत त्यांनीही अंगणवाडीचे वेगळेपण अनुभवले.मुलांच्या, पालकांच्या भेटी घेतल्या. मुलांबरोबर जेवणाचा आनंदही त्यांनी घेतला. परसबाग व चाईल्ड फ्रेंडली टॉयलेटविषयी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलें. ऑन लाइन, ऑफलाइन रजिस्टर, नोंदी, नेटके नियोजन व अंगणवाडी सेविका धनश्री कांबळे- जाहीर यांच्या सेवाभाव पाहत उपायुक्त विजयमाला माने यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.
यावेळी जिल्हा परिषद महिंला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जतच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शकुंतला निकम, पर्यवेक्षिका राजश्री कुंभार, बीट पर्यवेक्षिका ज्योती कांबळे यांच्यासह सनमडी, मायथळ व पवारवाडी अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
आयएसओ मानांकन, जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित
अंगणवाडी सेविका धनश्री कांबळे जाहीर यांनी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना मिळाली आहे. त्यांच्या नेटके नियोजन व सेवाभाववृत्तीमुळे सनमडी नरळेवाडीच्या अंगणवाडीला २०१५ मध्ये आयएसओ मानांकन मिळाले आहे. २०२२ साली अंगणवाडीस जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कामातील सातत्यामुळे नरळेवाडीची अंगणवाडी नवी उमेद घेत मुलांना धडे शिकविण्याचे काम मनापासून करत आहे. या सर्व यशाचे श्रेय अंगणवाडी सेविका धनश्री कांबळे- जाहीर आपल्या वरिष्ठांना, मदतनीस, ग्रामस्थ व पालकांना देतात.



