तासगावच्या बिल्डरचे ग्राहकांच्या ‘आनंदा’वर ‘सागरा’एवढे विरझन

0
12

नावात ‘आनंद’ पण ‘सागरा’ एवढे काळे कारनामे : 1

सांगलीतील ग्राहकांची फसवणूक : अर्धवट फ्लॅट ग्राहकांच्या माथी

तासगाव : अमोल पाटील

तासगाव : ‘करार संपूनही फ्लॅटचा ताबा न देणार्‍या, महिनो न महिने नव्हे तर वर्षानुवर्षे कामं रखडत ठेवणार्‍या, फ्लॅटधारकांनी जाब विचारलाच तर काय करायचं ते करा असं धमकावणार्‍या, वरपर्यंत हात असल्याचं सांगून ग्राहकांना बेदखल करणार्‍या, फ्लॅटचे शंभर टक्के पैसे घेऊनही उलट फ्लॅटधारकांनाच दमात घेणार्‍या, अक्षरश: झालेले करारही बासनात गुंडाळून निर्लज्जपणे साईटकडं पाठ फिरवणार्‍या काही बेजबाबदार, फसव्या बिल्डर्समुळे सांगलीचे बांधकाम क्षेत्र नाहक बदनाम होत आहे. अशा बिल्डर्सविरुध्द अनेक फ्लॅटधारकांनी पोलीसात आणि न्यायालयात तक्रारी दाखल केल्या असून रोज त्यात भर पडतेच आहे. आपले पण घर होणार या आनंदसागरातून अनेक ग्राहकांना थेट कोर्टाच्या दारात उभे रहावे लागते आहे.”

         

तासगाव येथील एका बिल्डरने सांगलीतील अनेक ग्राहकांना अर्धवट झालेले फ्लॅट देऊन लाखो रुपयांना गंडा घातला आहे. बँकांची कर्जे काढून लाखो रुपये घशात घालूनही संबंधित बिल्डर आपली साईट पूर्ण करत नाही. याबाबत जाब विचारला तर ग्राहकांनाच दमात घेतले जात आहे. तासगाव – मनेराजुरी रोडला इंग्रजी शाळा चालवणाऱ्या या बिल्डरने ग्राहकांना देशोधडीला लावले आहे. या बिल्डरच्या संस्थेच्या नावात *आनंद* आहे पण त्याचे *सागरा* एवढे काळे कारनामे आहेत. त्याचा मागोवा घेणारी लेखमाला आजपासून..!

       

सांगली शहर आणि उपनगरांमधून दिसेल तिकडे नवीन अपार्टमेंटस्ची बांधकामे सुरु आहेत. वन-टू-थ्री बीएचके असलेल्या अपार्टमेंटच्या उंचच्या उंच इमारती सांगलीत उभ्या रहात आहेत, राहिल्या आहेत. रोज एक नवीन साईट सुरु होते आहे. चौकाचौकात रोज नव्या प्रोजेक्टचे फलक झळकत आहेत. बुकींग करा- सवलत घ्या, बुकींग करा-लगेच ताबा घ्या, बुकींग करा-दोन महिन्यात फ्लॅटमध्ये रहायलाच या..पॉश एरियात-हिरव्यागार निसर्गात-सर्वसोयींनीयुक्त-मध्यवर्ती ठिकाणी..एक ना दोन. पण या सार्‍या जंजाळात काही बिल्डर्स मात्र व्यवसायाला बदनाम करत आहेत. अगदी प्रामाणिकपणे, करारानुसार, चोख काम करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना मात्र विनाकारण लोकांच्या सवालांना सामोरं जावं लागतं आहे.

       

सांगलीत स्वत:चा  वन बीएचके का होईना पण फ्लॅट असावा असा विचार करुन मध्यमवर्गीय माणूस धडपडत असतो. पण त्याचं हे स्वप्न सहजासहजी कसं पुर्ण होणार? प्रश्न पै पै साठवलेल्या पैशाचा असतो. पगार आणि घरकर्जाच्या हप्त्यांचा मेळ बसेल का, हा सवाल त्याला छळत असतो. अशा मानसिकतेत त्याला रस्त्यावर, चौकात दिसतात ती नव्या अपार्टमेंटस्ची भली दांडगी, देखणी डिजीटल्स. आपल्याला आवडत्या, सोयीच्या भागात कुठे नवीन अपार्टमेंट बांधकाम सुरु आहे का, हे त्याला हजार डिजीटल्सवरुन समजते आणि मग तो साईटवर जातो. 

     

तिथं स्लॅबपर्यंतचं बांधकाम तयार असतं. शेडवजा कार्यालयात बिल्डर, त्याचे मुकादम बसलेले असतात. यावेळी त्यांचा चेहरा इतका प्रामाणिक आणि बोलणं इतकं आपुलकीचं असतं की माणूस भारावून जातो. बांधकाम पुर्णच झालं आहे, महिन्याभरात ताबा देतो. कशाला भाड्याच्या घरात रहाता? महिन्याभरात सरळ तुमच्या हक्काच्या फ्लॅटमध्येच रहायला यायचं, असं आश्वासन दिलं जातं..आणि मग माणूस फ्लॅट घ्यायचा तर इथंच असं जवळजवळ फायनलच करतो.

छुपे दलाल घातकी..!

बिल्डर हूशार असेल तर त्यानं अगोदरच आपल्याच जवळच्या एका दुसर्‍याला फ्लॅटमध्ये गुंतवणूक करायला लावतो..आणि मग हे असे जवळचे ग्राहक वाटणारे पण खरे तर मालकांचेच दलाल या नव्या  फ्लॅटधारकाला न मागता गॅरंटी देतो. कशाला काळजी करता? एका महिन्यात फ्लॅटची चावी हातात आलीच म्हणून समजा. अहो, मी पण तुमच्यासारखाच आहे. इथं आलो आणि लगेच फ्लॅट बुक करुन टाकला..असं सांगतो. सहसा हे असे लोक गुंतवणूकीसाठी फ्लॅट घेणारे असतात. समाजात त्यांची विश्वासार्हता असते. हे असे छुपे दलालच मग बिल्डरसाठी एजंटवजा काम करायला लागतात. आपल्याच जवळच्या माणसांना साईट दाखवतात आणि फ्लॅट घ्यायला जवळपास भाग पाडतात.  लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि फ्लॅट बुक करतात..आणि सुरु होतो भयंकर मनस्तापाचा प्रवास. फ्लॅट बुक करुन *आनंदसागरात* डूबक्या मारायला लागलेल्या फ्लॅटधारकाला आपला आनंद कोर्टाच्या दारापर्यंत जाऊन मनस्तापात बदलणार आहे याचा पत्ताही तेव्हा नसतो.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here