★ १० हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थीची छत्री मोर्चात उपस्थिती
★ आंदोलन काळात तणाव; ५०० हुन अधिक पोलीस बंदोबस्त
★ मंत्री गिरीश महाजन, भरत गोगावले यांची घेतली भेट
मुंबई : आमचे प्रशिक्षण पूर्ण झाले आता हाताला काम द्या, आम्हाला शासकीय सेवेत सामावून घ्या, विद्या वेतन नको सेवा वेतन द्या, हभप तुकाराम बाबा महाराज तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, हल्ला बोल हल्ला बोल सरकारवर हल्ला बोलच्या जोरदार घोषणा देत राज्यभरातून आलेल्या दहा हजाराहून अधिक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीनी मुंबईच्या आझाद मैदानात विराट छत्री मोर्चा काढला व मुंबईचे आझाद मैदान दणाणून सोडले.
सकारात्मक निर्णय द्या अशी मागणी करत आझाद मैदानातून छत्री मोर्चा विधान भवनाकडे निघाला असता मोर्चेकरांना पोलिसांनी अडविले. पोलिसांनी त्यांच्याच गाडीत हभप तुकाराम बाबा महाराज, बालाजी चाकूरकर यांच्यासह शिष्टमंडळाला विधानभवनात नेले पण तेथे चर्चा फिस्कटली. निर्णय लागेपर्यत आझाद मैदान न सोडण्याचा निर्णय तुकाराम बाबांनी जाहीर केल्यानंतर छत्री मोर्चातील हजारो युवा प्रशिक्षणार्थीनी मैदानात ठाण मांडले. मोर्चाला दिलेली वेळ संपल्यानंतरही मोर्चेकरी मैदान सोडत नसल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. दंगल रोखणारे पथकासह ५०० हुन अधिक पोलीस मोर्चास्थळी आले. मोर्चातील महिला प्रशिक्षणार्थीची संख्या जास्त असल्याने महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस मोर्चास्थळी होते.
पोलिसांच्या चार मोठया व्हॅनही उभ्या करण्यात आल्या होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हभप तुकाराम बाबा, बालाजी चाकूरकर यांना वेळ संपली मैदान सोडावे, लोकशाही मार्गाने आंदोलन करा असे आवाहन केल्यानंतर हभप तुकाराम बाबा यांनी युवा प्रशिक्षणार्थीना आंदोलन तूर्तास मागे घेण्यास सांगितले.
राज्यभरातील सव्वा लाखाहून अधिक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांची सहा महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सहा महिन्यांनंतर त्यांना घरी बसावे लागत होते. हभप तुकाराम बाबा महाराज यांनी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून लढा उभा केला. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले, सांगलीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी देहू ते मुंबई पायीदिंडी काढली. या आंदोलनाची अखेर शासनाने दखल घेत पाच महिन्यांची मुदत वाढ जाहीर केली. पुढील महिन्यात मुदत संपणार असल्याने हभप तुकाराम बाबा महाराज यांनी संपूर्ण राज्यातील ३६ जिल्ह्याचा संवाद दौरा करत युवा प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला त्यानंतर १४ जुलैला मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करत थेट विधानभवनावर छत्री मोर्चाचे सोमवारी आयोजन केले होते.
मोर्चा दरम्यान बोलताना यवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आपण युवा प्रशिक्षणार्थी सोबत असल्याचे सांगितले. बालाजी चाकूरकर यांनी आपल्या आक्रमक शैलीत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टिका केली.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आक्रमक नेतृत्व करत शासन, प्रशासनाने युवा प्रशिक्षणार्थीच्या मागणीची दखल घ्या अन्यथा राज्यभर पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला.अनुप चव्हाण, प्रकाश साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
■ बैठक लावू- मंत्री गिरीश महाजन
हभप तुकाराम बाबा महाराज, बालाजी चाकोरकर यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या शिष्टमंडळाने मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी मंत्री महाजन यांनी यासंदर्भात बैठक लावू व योग्य निर्णय घेवू अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.
■ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपुढे प्रश्न मांडणार- मंत्री भरत गोगावले
आंदोलनानंतर हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली. मंत्री गोगावले यांनी युवा प्रशिक्षणार्थीच्या भावना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून मांडू व न्याय मिळवून देवू अशी ग्वाही दिली.




