मणेराजुरी : तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शक्तिपीठ महामार्ग ची मोजणी शेतकऱ्यांनी मंगळवारी बंद पाडली. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांच्या मध्ये वादावादी झाली. मोजणी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी आमची मोजणी करायचीच नाही असा निर्धार व्यक्त केला. सांगली जिल्ह्यात मोजणी होऊ देणार नाही, रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील मात्र शक्तिपीठ होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे किसान सभेचे कॉ उमेश देशमुख यांनी दिला.
वज्रचोढे गावातील शेतकऱ्यांना दोन दिवसा पूर्वी मोजणीच्या नोटीस देण्यासाठी तलाठी आणि सर्कल गेले होते मात्र गावातील एकाही शेतकऱ्याने नोटीस स्वीकारली नाही तरीही मंगळवारी सकाळी पोलीस फौंज फाट्यासह मोजणी कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी गावात आले. त्यांनी शेतकऱ्यांना सदर शासकीय काम आहे आमच्या कामात अडथळा आणू नका. आम्हाला आमचे काम करू द्या, अशी विनंती केली. मात्र आमच्या जमिनी मोजायच्या कि नाही हा आमचा निर्णय आहे. सदर काम शासकीय नाही. त्यामुळे आमच्या जमिनीत कुणालाही पाय ठेवू देणार नाही. अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यावेळी काही पोलीस सर्वाना ताब्यात घेवू काय अशी दमदाटी करू लागले. त्यावेळी शेतकरी चिडले, सर्वांनाच अटक करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. अशी दमदाटी चालू देणार नाही, आमच्या शेतीचे आम्ही मालक आहोत, मोजणी होऊ द्यायची कि नाही हा सर्वस्वी निर्णय आमचा आहे असे ठणकावून सांगितल्या नंतर सर्वांनीच तेथून काढता पाय घेतला. मोजणी करण्याचे थांबवून सर्व यंत्रणा माघारी परतली.
त्यानंतर आंदोलका समोर बोलताना महेश खराडे म्हणाले या रस्त्याला राज्याच्या अर्थ खात्याने विरोध केला आहे. राज्यावर 9 लाख 32 हजार कोटीचे कर्ज आहे. महामार्गसाठी आणखी 20 हजार कोटीचे कर्ज काढावे लागणार आहे. यामुळे राज्य दिवाळ खोरीत निघेल. असे अर्थ खात्याचे म्हणणे आहे. कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहयाद्री पर्वत रांगा मध्ये असलेली जैव विविधता संरक्षित आहे. तेथील एक झाड ही तोडू नका असे जागतिक पर्यावरण विभागाने म्हटले आहे. शक्तिपीठ मुळे हे सारे लयाला जाणार आहे. शेतकरी, राज्याचे अर्थखाते आणि पर्यावरण विभाग या सर्वांचा विरोध असताना मुख्यमंत्री का रेटत आहेत हा खरा प्रश्न आहे. यातील 15 ते 20 हजार कोटी हडप करण्यासाठीच सारा खटाटोप सूरू आहे.
उमेश देशमुख म्हणाले शक्तिपीठ मुळे सांगली आणि कोल्हापूर ला पुराचा मोठा फटका बसणार आहे. त्याच बरोबर बागायती जमीन ही मोठ्या प्रमाणात जाणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा शक्तिपीठ रद्दच झाला पाहिजे यावेळी प्रभाकर तोडकर, शरद पवार आदिनी मार्गदर्शन केले यावेळी धनाजी जाधव, विजय यादव, गजानन पाटील, अमरदीप यादव सुनील पवार आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




