सांगलीत रखडलेल्या प्रोजेक्टमधील ग्राहकांचे जीवघेणे हाल | तासगावच्या बिल्डरची मनमानी :  दलालांचे हात वर

0
6

तासगाव : अमोल पाटील*

       

तासगावच्या एकाला इंग्लिश स्कुल चालवता – चालवता बिल्डर बनण्याचे स्वप्न पडले. त्याने सांगली येथे संजयनगर भागात एक साईट सुरू केली. ग्राहकांना अल्पावधीत फ्लॅट देतो म्हणून लाखो रुपये उकळले. मात्र ग्राहकांना बँकेचे हप्ते सुरू झाले तरी अद्याप अनेकांना फ्लॅट ताब्यात मिळाले नाहीत. ज्यांना फ्लॅट मिळाले आहेत तेही अपूर्ण आहेत. अर्धवट फ्लॅट ग्राहकांच्या गळ्यात घालून बिल्डर नामानिराळा होऊ पाहत आहे. या रखडलेल्या प्रोजेक्टमुळे ग्राहकांचे हाल होत आहेत, तर बिल्डरची मनमानी सुरू आहे. दलालांनी तर अक्षरशः हात वर केले आहेत.

       

दहा वीस हजाराची नोकरी करत करत स्वत:च्या घराचं स्वप्न बघणारी साधी माणसं. सांगलीसारख्या शहरात आपलाही एकादा वन बीएचके फ्लॅट असावा यासाठी धडपडत असतात. जाहिरातींना भुलून, दलालांच्या शब्दावर भरवसा  ठेऊन, बिल्डरच्या गोड आश्वासनांना भुलून हे लोक हजार उचापती करुन फ्लॅटसाठी पंधरा वीस पंचवीस लाखाचे कर्ज काढतात आणि मग तिथून पुढं सुरु होते भयंकर ओढाताण. भयंकर मनस्ताप. 

       

अगदी जीव द्यायला भाग पाडणारी ही ओढाताण मग त्याला ग्राहक न्यायालय, रेरा च्या दारात उभं रहायला भाग पाडते..या सार्‍या मनस्तापान आज कित्येक ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. एका महिन्यात फ्लॅट ताब्यात देतो असं बिल्डरनं सांगितल्यावर आणि नुसतं सांगितल्यावरच नाही तर तसा करारनामा केल्यावर कोणाला आनंद होणार नाही? ग्राहक आत्तापासूनच आनंदसागरात उड्या मारायला लागतो. 

       

बुकिंगसाठीच्या पैशाची जुळवाजुळव करायला लागतो. या वळणावर त्याला हजारदा हजार ठिकाणी लायकी सिध्द करावी लागते. अगोदरचं कर्ज पेंडिंग असेल तर बँका, संस्था दारात उभे करत नाहीत. साधा वन बीएचके घ्यायचा झाला तरी बजेट पंधरा वीस लाखाच्या घरात जातं. काय करावं समजत नाही. हजार कागदपत्रे, दाखले, पगारपत्रके, जामीनदार, सातबारे, उतारे जमवता जमवता माणसं  घाईला येतात. कशीबशी सारी जंत्री गोळा करुन बँकेच्या दारात उभी रहातात आणि मग हजार अटी नियमानुसार हाऊसिंग लोन मिळतं.

*करारावर सही झाली की रंग दाखवायला सुरु..!*

हाऊसिंग लोन काढून लोक फ्लॅटचा करार करतात. निबंधकांसमोर पाचशे रुपयाच्या स्टँपवर करार होतात. हे करताना बिल्डर अगदी साखर तोंडात ठेऊन बोलत असतात. दलाल, मुकादम ग्राहकाला चहा पाजतात. निबंधकांसमोर दोघांच्या सह्या होतात. साईटच्या जाहिरातीत सांगितल्यानुसार सार्‍या सोयीसुविधांनी युक्त असलेला फ्लॅट, पार्किंग आणि इतर सुविधांसह करारात नमुद केलेल्या मुदतीत देण्याची कायदेशीर जबाबदारी याक्षणी बिल्डरवर असते. तसं त्यानं स्टँपवर लिहून दिलेलं असतं. हजार कागदपत्रे, दाखले, जामीनदार या सार्‍या कटकटी पार करुन कर्ज मंजुर होतं आणि बुकिंगची रक्कम हातात पडली की बिल्डर रंग दाखवायला सुरवात करतो. दलाल हात वर करतात. मुकादमाचा दर्शन होत नाही. इथून पुढचा प्रवास त्यांच्यासाठी जीवघेणा होतो. घर मिळणार या ‘आनंदसागरा’तून ग्राहक कर्जाच्या खाईत पडतात. 

*भयंकर मनस्ताप..!*

 दोन महिन्यात ताबा देतो असे सांगून पैसा घेतलेले सांगलीतील कितीतरी हौसिंग प्रोजेक्ट अनेक महिन्यांपासून रखडले आहेत. केवळ बिल्डर्सच्या मनमानी, बेजबाबदारपणाचा फटका अनेक ग्राहकांना नाहक सोसावा लागतो आहे. फ्लॅटसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थांबत नाहीत. त्यात सद्या रहात असलेल्या घराचं भाडंही सुरुच असतं. असे हप्ते आणि घरभाड्याच्या कात्रीत अडकलेले अनेक ग्राहक दाद मागायची कुणाकडं असा विचार करत आज कोर्टाच्या दारात उभे आहेत. काही जण तर आत्महत्येच्या विचारपर्यंत आले आहेत.

*(क्रमशः)*

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here