मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत प्रशिक्षणार्थींना हक्काची भाकरी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हभप तुकाराम बाबा महाराज यांनी शुक्र वार दि. १ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणचा इशारा दिला. १ ऑगस्टपासून कृष्णा नदीच्या येथील कृष्णामाई घाटावर हे बेमुदत उपोषण होणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले, राज्यात १,३४,००० युवा प्रशिक्षणार्थी सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर नोकरीची संधी न मिळाल्याने उपाशी आहेत आणि त्यांच्या हक्काच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहेत. तुकाराम बाबांनी प्रशिक्षणार्थ्यांसाठी न्याय आणि वेतनवाढीची मागणी केली असून, १ ऑगस्टपासून कृष्णामाई घाटावर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी येणार आहेत.
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम बाबांनी कृष्णामाई घाटाची पाहणी करुन प्रशिक्षणार्थ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी माजी नगरसेवक युवराज बावडेकर, सागर घोडके, धोबी सेवामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोहर साळुंखे आदींनी त्यांना पाठिंबा देऊन लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण संपल्यानंतर रोजगार मिळत नसल्याने युवक त्रस्त आहेत. त्यांचा प्रश्न त्वरीत सोडवण्याची मागणी तुकाराम बाबा यांनी केली आहे. सरकारने युवकांच्या रोजगार देण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी केली. यावेळी उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते विनायक यादव यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




