जादा परताव्याचे आमिष
डफळापूर (ता. जत) येथील एका बचत गटाच्या प्रतिनिधी असलेल्या महिलेस समाजमाध्यमांद्वारे लिंक पाठवून ‘हप्ते भरा, जादा पैसे देऊ’ अशी बतावणी करत त्यांची ८ लाख ५ हजार ८१० रुपयांची ऑनलाईन खात्यावरून फसवणूक केली. याबाबत अर्चना दिलीप बेळुंखे (वय ३२, रा. विठ्ठलनगर, डफळापूर) या महिलेने जत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण अधिक तपासासाठी सायबर गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ९ ते १७ जुलैदरम्यान अर्चना बेळुंखे यांच्या मोबाईलमधील अर्चना बेळुंखे नावाच्या टेलिग्राम अंकाऊंटवर आर्या फातिमा (आर्या फातिमा युजरनेम) नावाच्या टेलिग्राम खातेधारकाने तसेच अर्जुन प्रसाद युजरनेम असलेल्या खातेधारकाने बेळुंखे यांना लिंक पाठवली होती. त्यानंतर वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यानंतर पैसे देण्याचे खोटे आमिष दाखविले. अर्चना बेळुंखे यांच्याकडून वेगवेगळ्या बचत खात्यांद्वारे एकूण ८ लाख ५ हजार ८१० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




