सांगली : नांदणी येथील मठातून महादेवी हत्तीणीला वनतारा केंद्रात नेत असताना जैन समाजातील तरुणांच्या भावनांचा बांध फुटला. त्यातून त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या, मात्र परिस्थिती लक्षात घेता त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत खासदार पाटील यांनी सहभाग घेत आपले मुद्दे प्रभावीपणे मांडले. विशेषतः नागरिकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची आग्रही मागणी केली. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की नांदणी मठाला सुमारे १२०० वर्षांची परंपरा आहे. १९९२ मध्ये महादेवी हत्तीणीला नांदणी मठात आणले, तेंव्हा तिचे वय सहा वर्षे होते. इतके वर्षे या हत्तीणीचा व्यवस्थित सांभाळ केला गेला. तेथे हत्ती सांभाळण्यासाठी विविध सुविधा आहेत. त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. हत्तीणीचा आणि त्या भागातील नागरिकांचा, जैन श्रावक-श्राविकांचा स्नेहबंध आहे. त्यांचे भावनिक नाते तयार झाले आहे. अशावेळी हत्तीणीला येथून नेले जात असल्याचे पाहून या भागातील नागरिकांत उद्रेक झाला. त्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुमारे १६० जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत.
शिवाय, वनतारा केंद्रात दाखल करण्यात आलेल्या महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात आणण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण सहकार करावे. जैन समाजासह सर्वच समाज बांधवाच्या भावनांचा आदर करावा. या प्रकरणी सरकारने सहानुभुतीने विचार करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षादेखील खासदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.




