नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी भेट घेऊन महाराष्ट्रातील 160 जागा जिंकवून देण्याची गॅरंटी दिली होती, असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “मला आठवतंय, विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये दोन लोक मला भेटायला आले. त्यांची नावे, पत्ते आता माझ्याकडे नाहीत. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात 288 जागा आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देऊ. मला हे ऐकून आश्चर्य वाटलं. पण निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नसल्यामुळे त्याकडे मी दुर्लक्ष केलं.”
पवारांनी पुढे सांगितलं की, त्या दोन लोकांची भेट राहुल गांधी यांच्यासोबतही घडवून आणली होती. “आम्ही ठरवलं की जनतेत जाऊन जो कौल मिळेल तोच स्वीकारू. म्हणून त्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला,” असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
ही घटना राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणारी ठरली असून, निवडणुकीपूर्वीच्या ‘गॅरंटी’ व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



