अमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात नवा आधारस्तंभ

0
7

मिरज : सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अत्याधुनिक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र सुरु झाले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने हे केंद्र कार्यान्वित झाले असून जिल्हाधिकारी अशोक काकडे, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांच्या समन्वयातून या उपक्रमाला गती मिळाली.

हे केंद्र ६ अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असून अमली पदार्थांमुळे होणारे मानसिक व शारीरिक विकार दूर करण्यासाठी विशेष थेरपी उपलब्ध आहेत. यामध्ये मॉडिफाइड ECT, मल्टी बिहेवियरल थेरपी, अव्हर्जन थेरपी, सेरेब्रल व क्रॅनियल स्टिम्युलेशन तसेच RTMS मशीनचा समावेश आहे. या माध्यमातून व्यसनाधीन रुग्णांना तल्लफ, नैराश्य, घाबरटपणा, हिंसक प्रवृत्ती यावर उपचार मिळणार आहेत.

रुग्णांना या केंद्रात नातेवाईकांसह दाखल करून दोन ते तीन आठवडे उपचार दिले जातील. आयुष्मान भारत योजनेतून उपचार व निवास विनाशुल्क असून, आवश्यक कागदपत्रे नसल्यास ३-४ हजार रुपये खर्च येतो. खासगी रुग्णालयात अशाच उपचारांसाठी २५-४० हजारांचा खर्च अपेक्षित असल्याने हे केंद्र गरजूंसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. तसेच रुग्ण व कुटुंबीयांची नावे गुप्त ठेवली जातील.

पालकमंत्री पाटील यांनी अमली पदार्थमुक्तीची चळवळ उभी करत कायद्याचा धाक, जनजागृती आणि उपचार केंद्र या त्रिसूत्रीवर भर दिला आहे. मिरजचे हे केंद्र केवळ उपचाराचे ठिकाण नसून व्यसनाधीनांना नवे जीवन देणारा “पुनर्वसनाचा आधारस्तंभ” ठरणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here