अडचणीच्या काळातही काँग्रेससोबत खंबीरपणे उभं राहिलेल्या कार्यकर्त्याचा सन्मान करत जत तालुकाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. निष्ठा आणि परिश्रमाचं फलित म्हणून मिळालेली ही जबाबदारी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरणार आहे.
जत तालुका काँग्रेस कमिटीचा पदनिवड कार्यक्रम व कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात व दिमाखात जत येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार खा.विशाल पाटील,माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम, तसेच जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.1



या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांची जत तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तर जत शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तरुण व उत्साही कार्यकर्ता श्री.निलेश बामणे यांची निवड झाली.या निवडींमुळे तालुका व शहर काँग्रेस संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्या २२ विविध सेलचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले. महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, किसान काँग्रेस, ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, अनुसूचित जाती-जमाती सेल, व्यापारी सेल आदी महत्त्वाच्या आघाड्यांवर नवे पदाधिकारी निवडून संघटनेत व्यापक बळकटी आणण्यात आली.

खासदार विशालदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, “काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवून लोकांच्या प्रश्नांसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज राहिले पाहिजे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनशक्ती अधिक बळकट करणे ही काळाची गरज आहे.”
माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम म्हणाले की, काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष असून ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, महिला व युवक यांच्या समस्यांसाठी नेहमीच सज्ज आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे जत तालुका काँग्रेस आणखी सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष आ.विक्रमसिंह सावंत यांनी अध्यक्षस्थान भूषवत सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “गावोगावी काँग्रेसची विचारधारा पोहोचवून पक्ष संघटना अधिकाधिक वाढवणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. नव्या निवडींनंतर घोषणाबाजी आणि उत्स्फूर्त आनंदामुळे संपूर्ण वातावरण काँग्रेसमय झाले.




