इस्लामपूर आगाराची एक एसटी बस (एमएच ०७ सी ९२८५) सोमवारी दुपारी वाघवाडीजवळ झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. बस चालक नशेत असल्याचा संशय जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून, संबंधित चालकासह त्याला गाडी चालवण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास इस्लामपूरहून कोडोलीकडे निघालेली ही बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. वाघवाडीच्या पुढे राजमुद्रा आश्रम शाळेसमोर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर ही बस अचानक आदळली. या अपघातात बसमधील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांसह एकूण १५ जण जखमी झाले. सर्व जखमींवर इस्लामपूर आणि लाडेगाव येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या चिकुर्डे येथील एका जखमी मुलीच्या पालकांनी सांगितले की, बससमोर कोणतेही वाहन नसतानाही चालक हनुमंत यशवंत घोरपडे (रा. बहादुरवाडी, ता. वाळवा) यांनी दारूच्या नशेत गाडी झाडावर घातली. पालकांनी असा सवाल केला आहे की, चालक नशेत असतानाही आगारातील अधिकाऱ्यांनी त्याला गाडी चालवण्याची परवानगी दिलीच कशी? या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या घटनेबाबत इस्लामपूर आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की चालकाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. तसेच, पोलिस स्टेशन आणि इस्लामपूर आगाराच्या संयुक्त पंचनाम्यानंतर चालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून आणि प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून राजमुद्रा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातानंतर बस एका बाजूला पूर्णपणे कलंडली असल्याने प्रवाशांना बाहेर काढणे कठीण झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी बसचा आपत्कालीन दरवाजा आणि ड्रायव्हर सीटच्या बाजूने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.




