जतमध्ये पडळकरांभोवती जयंतरावांचा चक्रव्यूह : दोन माजी आमदार एकाच व्यासपीठावर

0
1147

जत :“आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का” असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक शैलीत आणि फडणवीसांच्या कृपाशिर्वादाने जोरात धावत असताना, त्यांची गाडी थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी जतमध्ये आपला मोर्चा वळवला आहे. आटपाडी आणि खानापूरनंतर आता पडळकरांचा मतदारसंघ असलेल्या जतमध्ये जयंतरावांनी चक्रव्यूह रचण्याची मोहीम सुरू केली आहे.

पडळकर विरुद्ध जयंतराव – जुना संघर्ष नवा रंग

आ. पडळकर आणि आ. जयंत पाटील यांच्यातील वैर हे जिल्ह्याच्या राजकारणातील जुने प्रकरण आहे. पडळकरांनी २०२४ मध्ये जयंतरावांची जोरदार ताकद असूनही ३८ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. तेव्हापासूनच दोघांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. पडळकर आक्रमक टीकेसाठी ओळखले जातात, तर जयंतराव आपल्या खास मिश्किल शैलीत पलटवार करत असतात.

माजी आमदारांची एकी

आगामी निवडणुकांसाठी जयंतरावांनी जत तालुक्यात विशेष रणनिती आखली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी पडळकर विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यात पहिल्याच टप्प्यात यश मिळाल्याचे दिसून आले. संख येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी आमदार विलासराव जगताप आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विक्रमसिंह सावंत एकाच व्यासपीठावर आले. दोघांनीही एकमेकाला टाळी देत “भूमिपुत्र हवा” असा नारा देत पडळकरांना लक्ष्य केले.

नव्या समीकरणांचा खेळ

जयंतरावांनी पूर्व भागातील ६५ गावांना वरदान ठरणाऱ्या विस्तारित योजनेचे श्रेय स्वतःकडे घेत आगामी निवडणुकीत त्याचे मतांत रूपांतर करण्याचा डाव आखला आहे. पडळकरांच्या गडात नाराज कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या पाटीवर खेचण्याचाही प्रयत्न जयंतरावांनी केला आहे.

चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान

राजकारणात करेक्ट कार्यक्रम करण्यात पटाईत समजले जाणारे जयंतराव आता जतमध्ये पडळकरांना रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, ‘पडळकर विरुद्ध सारे एकत्र’ हा फार्म्युला जतकरांना रुचेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गणित जुळले तर जयंतरावांचा डाव यशस्वी होईल; अन्यथा उलटफेर होऊन अंगलटही येऊ शकतो.

आगामी निवडणुकीत जयंतरावांचा चक्रव्यूह भेदून पडळकर आपली गाडी वेगात धाववत राहतात की जयंतराव त्यांना ‘करेक्ट कार्यक्रम’ करून थोपवतात, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here