डीव्हीआर गायब, पुरावे पुसले तरीही जाळ्यात अडकले ‘स्पेशल सेव्हन’

0
18

बेळगाव ते कवठेमहांकाळ : कोट्यवधींच्या लुटीचा बदललेला प्लॅन”

सांगली : बेळगावला ‘टार्गेट’ करून निघालेल्या सात जणांच्या टोळीचा प्लॅन अखेर ऐनवेळी बदलला… कारण तेथे एका खूनानंतर पोलिसांचा जाळा अधिक घट्ट झाला होता. याच क्षणी टोळीने वळसा घेत कवठेमहांकाळ गाठले. आणि शांत, सुस्तावलेल्या रात्रीत अचानक डॉक्टरांच्या घराचे दरवाजे ठोठावून ‘पोलिस असल्याचा आव आणला’… काही क्षणांतच तब्बल सव्वा कोटींचा मुद्देमाल त्यांच्या हाती लागला.

छाप्यातील चौघे – दीक्षा भोसले, महेश शिंदे, अक्षय लोहार आणि शकील पटेल – हे थेट आत शिरले. हातात कागदपत्रे, इंग्रजी भाषेतील जप्तीची बनावट यादी… एवढा खोटा देखावा होता की, क्षणभर घरच्यांना खरेच पोलिस आले असे वाटले. दरम्यान उर्वरित तिघे बाहेर गाडीतच थांबले होते. ऐवज हस्तगत होताच खेळ संपला… सगळे वेगवेगळ्या दिशांना पसार झाले.

पण खरी चूक झाली ती घरच्यांकडून! छापेमारीनंतर त्यांनी सर्वप्रथम पोलिसांना न कळवता आपल्या सीएला आणि नंतर नातेवाईकांना फोन केले. त्या विलंबामुळे ‘स्पेशल सेव्हन’ टोळी जिल्ह्याबाहेर निघून गेली. अधीक्षक संदीप घुगे यांनी खंत व्यक्त करत सांगितले, “वेळीच माहिती मिळाली असती तर आरोपी मुद्देमालासह पकडले गेले असते.”

दरम्यान, या कटाचा सूत्रधार ठरला महेश शिंदे. अभियंता असल्याने त्याचे इंग्रजी उत्तम. त्यामुळे जप्तीची बनावट यादी तयार करण्याचे काम त्यानेच केले. तो मूळ जयसिंगपूरचा असला तरी काही काळ कवठेमहांकाळात वास्तव्यास राहिल्याने घराबद्दलची माहिती त्याला होती. त्यानेच बेळगावऐवजी कवठेमहांकाळचे टार्गेट सुचविले.

टोळीने भाड्याने घेतलेल्या इनोव्हा गाडीतून सांगलीत हिंडले, खरेदी केली, खाणेपिणे केले आणि रात्रीच्या गडबडीत धडकले डॉक्टरांच्या घरावर. गुन्ह्यानंतर गाडी सांगोला येथे सोडली. तेथून बसने मोहोळला गेले. तेथे ऐवज साई आणि पार्थ मोहिते यांच्याकडे सुपूर्द केला.

सीसीटीव्हीचा डीव्हीआर उचलून नेत पोलिसांना गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण फारसा उपयोग झाला नाही. पोलिसांनी हालचालींचा माग घेतला आणि पुण्यातील तरुणी दीक्षा भोसले पहिल्यांदा जाळ्यात सापडली. तिच्या कबुलीजबाबातून धागेदोरे सुटले आणि हातकणंगले येथे साई व पार्थ मोहिते अटक जाळ्यात सापडले. त्यांच्या बॅगेत मुद्देमाल सापडला.

अधीक्षक घुगे यांनी सांगितले की, “ही सर्व मंडळी पदवीधर असून छापेमारीची पूर्ण माहिती त्यांना होती. योजनेतील प्रत्येक पाऊल ठरलेले होते.”या परिपूर्ण कटामागचा सूत्रधार एकच महेश शिंदे हाच समोर आला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here