नवी दिल्ली, दि. २२ सप्टेंबर २०२५ :
देशभरातील नागरिकांना बचत व किफायतशीर खरेदीची नवी संधी देण्यासाठी आजपासून GST बचत उत्सव सुरू होत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
देशाला उद्देशून दिलेल्या विशेष संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले की, “या उत्सवामुळे प्रत्येक आर्थिक वर्गातील नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे. बचतीत वाढ होईल आणि आवडत्या वस्तू व सेवांची खरेदी सुलभ होईल.”
सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पासून GST सुधारणांचा पुढील टप्पा अंमलात येत असून, त्यामुळे देशात व्यवसाय करणे अधिक सुलभ होईल. विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्य समान भागीदार ठरेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
“२०१४ मध्ये जेव्हा आम्हाला संधी मिळाली तेव्हा राष्ट्रीय आणि सार्वजनिक हितासाठी GST सुधारणा हाच आमचा प्राधान्यक्रम होता. प्रत्येक राज्य व भागधारकांच्या चिंता दूर करूनच स्वतंत्र भारतात इतकी मोठी करसुधारणा शक्य झाली,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.




