सांगली : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय सांगली फळ महोत्सवात तब्बल 9 लाख 12 हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती पणन अधिकारी ओंकार माने यांनी दिली.
या महोत्सवात जत, कवठेमहांकाळ, विटा, वाळवा व आटपाडी तालुक्यातील 22 फळ उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. पिवळे व गुलाबी ड्रॅगनफ्रुट, पेरू, चिकू, केळी, अंजीर, डाळिंब, सीताफळ आदी फळांची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे जत तालुक्यातील शेतकऱ्याने तयार केलेले ड्रॅगनफ्रुटचे आईस्क्रीम प्रथमच सांगलीकरांना चाखायला मिळाले.
महोत्सवात व्यंकटेश ॲग्रोने मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत जांभूळ, लिंबू, पपई व स्ट्रॉबेरीवर आधारित उत्पादने विक्रीस आणली होती. या उपक्रमातून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासह फळांवर प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार असल्याचे मंडळाचे उप सरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले.
संभाजी कोडग, विजय मोरे, प्रविण कुंभार आदी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे व पणन विभागाचे आभार मानून अशा महोत्सवांची पुढेही अपेक्षा व्यक्त केली.




