– विक्रमसिंह सावंत ; जत तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल
जत : जत तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळिंब या फळबागांसह बाजरी, मका, भुईमूग, तूर यांसारख्या पिकांवर पावसाचे पाणी साचल्याने पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बोर्गी खुर्द, बोर्गी बु, हळळी, बालगाव, माणिकनाळ, अक्कळवाडी, उमदी, सुसलाद, सोनलगी या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहून सावंत यांनी शेतकऱ्यांना धीर दिला व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
सरकारकडे ठाम मागणी करताना सावंत म्हणाले, “तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य तेवढी नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष मदत मिळणे गरजेचे आहे.” त्यांनी प्रशासनालाही सूचित केले की पंचनामे टाळाटाळ न करता तत्परतेने करावेत व भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी.
सावंत म्हणाले, “शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन उभी केलेली पिके हीच त्यांची जीवनरेखा आहे. परंतु अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून जात आहे. अशा वेळी सरकारने तातडीने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, हीच खरी मदत ठरेल.”
या पाहणीत मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिले होते. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि भवितव्याची चिंता दिसून येत होती. अनेकांनी शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी व्यक्त केली. तर मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात आला.
या पाहणीत विक्रमसिंह सावंत यांच्यासह बाबासाहेब कोडग, मारुती पवार, अनिल पाटील, श्रीशैल बगली, संजय सावंत, बंडू शेवाळे, जोतीबा शेवाळे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.




