कचरा व्यवस्थापन, जनजागृती आणि सार्वजनिक स्वच्छतेचे उपक्रम राबवले
सांगली : “स्वच्छता ही सेवा” पंधरवडा उपक्रमांतर्गत सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने शहरभर विविध स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांमधून कचरा व्यवस्थापन, नागरिक जनजागृती आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यांचा प्रभावी संगम साधण्यात आला.
प्रभाग समिती क्रमांक २ मधील धामणे रोड परिसरात कचरा संकलनाची विशेष मोहीम राबवून कंटेनरमधील साचलेला कचरा उचलण्यात आला. परिसर निर्जंतुकीकरण करून नागरिकांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कुपवाड येथे महापालिकेच्या लॉन परिसरात स्वच्छता निरीक्षकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्याचबरोबर सर्व स्वच्छता निरीक्षकांना जनजागृतीसाठी बॅनर वितरित करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
दरम्यान, राज स्पोर्ट्स क्लब येथे चालू असलेल्या हॉलीबॉल स्पर्धेदरम्यान खेळाडू व आयोजकांना स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. स्वच्छ परिसर खेळाच्या गती व मानसिक समाधानाशी जोडलेला असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
आयुक्त सत्यम गांधी यांनी या प्रसंगी सांगितले की, “स्वच्छतेसारखा दुसरा धर्म नाही. प्रत्येक विभाग व नागरिकाने मिळून या पंधरवड्यातून स्वच्छतेची संस्कृती रुजवावी.”
महापालिकेच्या वतीने येत्या दिवसांत प्रभागनिहाय स्वच्छता मोहीमा, प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती आणि विविध IEC कार्यक्रम राबवले जाणार असून “स्वच्छता ही सेवा” ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




