तासगाव-कवठेमहांकाळकडे राजकीय वळण ! | सगरे भाजपच्या वाटेवर? पाटील-घोरपडे गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता**

0
112

तासगाव :
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेला जोर चढला आहे.

विशेष म्हणजे, माजी खासदार संजय पाटील आणि महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या गटाची भूमिका आगामी समीकरणात निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. त्याचबरोबर आमदार रोहित पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या हालचालीकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

🔹 सगरे गटाची वाटचाल भाजपकडे?

महांकाली साखर कारखान्याचे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. हे कोडे सोडवण्यासाठी सगरे गटाची वाटचाल भाजपच्या दिशेने असल्याची चर्चा सुरू आहे.
कुंडलचे नेते शरद लाड यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर, सगरे गटाचाही प्रवेश जवळ आला असल्याची राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. जर हा गट भाजपकडे गेला, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील सत्तासमीकरणांना निर्णायक वळण मिळू शकते.

🔹 संजय पाटील देणार पहिला राजकीय धक्का?

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात राजकीय भूकंपाचा पहिला झटका माजी खासदार संजय पाटील यांच्या भूमिकेतून बसू शकतो, अशी चर्चा आहे.
आगामी ८ ऑक्टोबर रोजी “काका गटाचा मेळावा” आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यानंतर जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

🔹 आमदार रोहित पाटील यांची निर्णायक भूमिका

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील सध्या जिल्हा परिषदेतील बहुतांश गटांवर वर्चस्व राखून आहेत. हे वर्चस्व टिकवून ठेवताना ते इतर नेत्यांशी हातमिळवणी करतील का, हा पुढील राजकीय समीकरणांचा निर्णायक मुद्दा ठरणार आहे.

🔹 घोरपडे गटाची भूमिका रहस्यमय

माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत वेगळी भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून जिल्ह्याच्या राजकारणात धक्का दिला.


सद्यस्थितीत घोरपडे समर्थकांची आमदार जयंत पाटील यांच्याशी जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे मिरज पूर्व भाग आणि कवठेमहांकाळ तालुक्यात घोरपडे गट कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


एकूणच, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून, येणाऱ्या काही दिवसांत जिल्ह्याच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here