सांगली :
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी मंगळवारी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांती समूह हा डाव्या विचारांचा म्हणून परिचित असून, या विचारांचा पाया स्वातंत्र्य काळात क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड यांनी घातला होता. बापूंच्या समाजसेवेचा वारसा घेऊन आमदार अरुण लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाजसेवेचे कार्यरत राहिले, तर आता त्यांच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय दिशा बदलली आहे.
या कार्यक्रमात सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, तसेच भाजपा जिल्हा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद लाड यांनी बोलताना म्हटले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह सर्व निवडणुकांमध्ये पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून योगदान देईन.”
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनीही युवा पिढीला भाजपच्या विकासात्मक धोरणाची जाणीव करून देत, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धोरणांवर आधारित पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
शरद लाड यांच्या पक्षप्रवेशासाठी गेले दोन महिने प्रयत्न सुरू होते, तसेच पदवीधर मतदार संघाची आगामी निवडणूक यामागील मुख्य कारण असल्याचे संकेत दिसून येत आहेत. जिल्ह्यात महाकाली सहकारी साखर कारखान्याचे ताबा घेतलेल्या उपाध्यक्ष जयश्री पाटील आणि संचालिका अनिता सगरे याही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात आहे.




