जयसिंगपूर : दिवाळीचा उत्साह ओसरत असतानाच जयसिंगपूर परिसरात बुधवारी सकाळी झालेल्या खुनाच्या घटनेने परिसर हादरला आहे. चिपरी (ता. शिरोळ) येथील संदेश लक्ष्मण शेळके (वय २२) या तरुणाचा धारदार हत्याराने निर्घृण खून करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संदेश हा सांगली–कोल्हापूर महामार्गावरील चिपरी फाट्याजवळ बहिणीला सोडून मोपेडवरून गावाकडे परतत असताना ही घटना घडली. मध्येच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार हत्याराने मानेवर, पाठीवर आणि वर्मी वार करून हल्लेखोरांनी त्याचा जागीच खात्मा केला.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला. पोलिस उपअधीक्षक रोहिणी सोळंके आणि पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
जयसिंगपूर आणि चिपरी परिसरात या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
👉 ठळक मुद्दे:
लक्ष्मीपूजनानंतर घडलेली धक्कादायक घटना
२२ वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने खून
पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू



