नगराध्यक्षपदासाठी महिलांमध्ये चुरस
पलूस : पलूस नगरपालिकेच्या २० नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक जाहीर होताच तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना काँग्रेसकडून “आमचं ठरलंय…!” असा आत्मविश्वासपूर्ण दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे मात्र भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीत नगराध्यक्षपदावरून तिढा निर्माण झाला असून तो अद्याप सुटलेला नाही.
युतीत उमेदवारीवरून संघर्ष
भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि राष्ट्रवादीचे नीलेश येसुगडे यांच्या गटात उमेदवारीवरून संघर्ष पेटला आहे. जिल्हास्तरावर तोडगा न निघाल्याने हा प्रश्न थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात गेला आहे. येत्या ७ नोव्हेंबर रोजी मुंबईत निर्णायक बैठक होणार असून त्यात युती कायम राहते की तुटते, हे स्पष्ट होणार आहे.
महिला राखीव नगराध्यक्षपदावर चुरस
या वेळी नगराध्यक्षपद महिला राखीव असल्याने भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिंदेसेना, काँग्रेस आणि उद्धवसेना या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आचारसंहितेची घोषणा होताच इच्छूकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली असून नेत्यांच्या गाठीभेटी, चर्चासत्रांना वेग आला आहे.
युतीतील तणाव कायम
भाजपात अलीकडेच शरद लाड यांच्या प्रवेशाने पक्षाचे बळ वाढले असले, तरी संग्राम देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यातील मतभेद अद्याप कायम आहेत. त्यामुळे युती टिकेल की तुटेल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. राजकीय वर्तुळात ‘पलूसचा तिढा मुंबईत सुटणार की फुटणार’ या चर्चेला उधाण आले आहे.
मागील निवडणुकीतील बलाबल :
काँग्रेस : १२ नगरसेवक व नगराध्यक्ष
स्वाभिमानी विकास आघाडी (सध्या राष्ट्रवादी अजित गट) : ४ नगरसेवक
भाजप : १ नगरसेवक
मागील निवडणुकीत ८ प्रभागांतून १७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशी एकूण १८ सदस्यांची रचना होती. यावेळी मात्र १० प्रभागांतून २० नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष निवडले जाणार असून एकूण २१ सदस्यांचे नवे सभागृह तयार होणार आहे.
– पलूस नगरराजकारणात पुन्हा रंगणार चुरशीची लढत!




