जत : संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर करून देतो, असे आश्वासन देत महाडिकवाडी (शेगाव) येथील ७७ वर्षीय वृद्ध महिलेची तब्बल २० लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
फसवणूक झालेल्या महिलेचे नाव श्रीमती आकाताई श्रीमंत महाडिक (वय ७७) असे असून त्या आजारी असल्याची संधी साधून संशयितांनी चंगळ घातल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, २ ते ३ जुलैदरम्यान अनिल रावसो नलवडे, जालिंदर बापू नलवडे, सागर जालिंदर नलवडे, अविनाश सोपान महाडिक आणि अतुल सोपान महाडिक (सर्व रा. महाडिकवाडी, शेगाव) या पाच जणांनी संगणमत करून बनावट खरेदी दस्त तयार केला.
पेन्शन मंजुरीचे आमिष दाखवत त्यांनी वृद्ध महिलेचा अंगठा घेऊन तिच्या नावावरील जमीन विक्रीची प्रक्रिया उभी केली. त्यानंतर जमीन विक्रीतून मिळालेली २० लाखांची रक्कम आपसांत वाटून, महिलेची निर्भीड फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी संबंधित पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.




