शहरात काय सुरू आहे?मनपाची ‘झिरो टॉलरन्स’ कारवाई पुन्हा एकदा चर्चेत | ७०+ अतिक्रमणे रात्रातच गायब!

0
34

सांगली : स्वच्छ व सुरक्षित शहरासाठी सुरू केलेल्या ‘स्वच्छ रस्ते – सुरक्षित शहर’ अभियानाला सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचा सलग तिसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. मनपा आयुक्त सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच उपायुक्त सौ. आश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दोन टप्प्यांत जोरदार अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

सकाळी कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलिस चौकी परिसरात तर दुपारी १०० फुटी रोडवर मनपा पथकांनी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे, व्यावसायिक संरचना आणि रस्त्यांवरील अडथळे हटवले. एकाच दिवसात ७० पेक्षा अधिक अनधिकृत संरचना काढून टाकल्याने पादचारी मार्ग आणि रस्त्यांची रुंदी पुन्हा मोकळी झाली. वाहतुकीची सुसूत्रता वाढण्यास मोठा हातभार लागला.

सकाळ सत्रात टी-बोर्ड, शेड्स, कमानी, बोर्ड, कट्टे, छपऱ्या आणि अनधिकृत जिना यांवर कारवाई झाली; तर दुपार सत्रात १०० फुटी रोडवरील ३४ अडथळादायक कट्टे, शेड्स, लोखंडी खोका, टी-बोर्ड, बोर्‍याक्ट व एक भिंत हटवण्यात आली.

“शहरातील सार्वजनिक रस्ते नागरिकांच्या सुरक्षित वापरासाठी आहेत. कोणतेही अतिक्रमण विकासाला अडथळा ठरते. कारवाई सातत्याने सुरू राहील,” असा ठाम संदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला.

या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त आश्विनी पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, अतिक्रमण अधीक्षक नागार्जुन मद्रासी तसेच नगररचना व स्वच्छता विभागाचे अधिकारी सहभागी झाले. संपूर्ण कारवाई मनपा कर्मचाऱ्यांनी समन्वयाने, शांततेत आणि व्यावसायिक पद्धतीने पूर्ण केली.

मनपा प्रशासनाने पुढील दिवसांत शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि पादचारी मार्गांवर आणखी व्यापक व कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here