सांगलीत महायुतीत तणाव शिगेला | आष्टा–शिराळा–तासगाव वगळता बहुतेक ठिकाणी भाजप–शिंदेसेनेचा संघर्ष टोकाला

0
12

सांगली : राज्यात भाजप आणि शिंदेसेना या मित्रपक्षांमध्ये वाढत चाललेल्या तणावाची झळ सांगली जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत स्पष्टपणे जाणवू लागली आहे. आष्टा, शिराळा आणि तासगाव हे अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस, मतभेद आणि खुले संघर्ष समोर येत आहेत.

सांगलीतील सहा नगरपरिषद व दोन नगरपंचायतींसाठी रणधुमाळीला सुरुवात झाली आहे; मात्र महायुती म्हणून एकत्र येण्याचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. तिन्ही पक्षांची मोट बांधता न आल्याने भाजप–शिंदेसेना या प्रमुख सहयोगी पक्षांमध्येही सख्य दिसत नाही.

ईश्वरपूरमध्ये विकास आघाडीच्या नावाखाली सर्व पक्ष एकत्र आले असले तरी भाजप–शिंदेसेनेचे नाते केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित आहे. विटा नगरपरिषदेत तर दोन्ही पक्ष थेट आमनेसामने असून एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचे प्रकार चर्चेत आहेत. आटपाडीमध्ये शिंदेसेना स्वतंत्र लढत असून भाजपमध्ये गटबाजीमुळे महायुतीचे त्रांगडे वाढले आहे. जतमध्येही दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्यासाठी सज्ज आहेत आणि मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.

पलूसमध्ये भाजप–शिंदेसेनेचे सूर नेहमीच विसंगत राहिले असून येथे चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे शिराळा व आष्टा येथे दोन्ही पक्षांची मैत्री जमली असली तरी राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वतंत्र धोरणावर ठाम आहे. तासगावमध्ये मात्र केवळ औपचारिक एकत्रीकरण पार पडल्याचे दिसते.

एकूण जिल्ह्यात मैत्रीचे प्रमाण फक्त ३७.५ टक्के तर संघर्षाचे प्रमाण तब्बल ६२.५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here