मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने एक मोठा राजकीय निर्णय घेतला आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत भाजप ३५ वर्षांखालील तरुणांना किमान ४० टक्के तिकिटे देणार आहे. पक्षातील नव्या नेतृत्वाला वाव देणे आणि युवाशक्तीवरचा विश्वास दृढ करणे हा या धोरणामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे भाजपमधील अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांची तिकीट कापली जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, महानगरपालिका, जिल्हा परिषद ते पंचायत समितीपर्यंत सर्व स्तरांवर हा नियम लागू होणार असल्याची माहिती मिळते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करू शकतो. युवा नेतृत्वाला पुढे आणण्याच्या भाजपच्या या निर्णयाचे यश किती मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




