जत : जत नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार जोरात असताना प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिक मात्र निकृष्ट कामामुळे त्रस्त झाले आहेत. उमेदवार, आमदार, माजी आमदार गल्लोगल्ली फिरून विकासाच्या घोषणा करत असताना प्रभागातील महिलांनी “विकास विकास म्हणतात… तो हाच का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
प्रभागात नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनसाठी उत्तम दर्जाचे सिमेंट काँक्रेटचे रस्ते खोदून त्याच्या मधोमध पाणीपुरवठा पाइपा टाकण्यात आल्या. मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने रस्ता पूर्ववत न करता सिमेंट काँक्रेटचा मलबा रस्त्यावरच टाकून दिला. परिणामी रहिवाशांना आणि वाहनचालकांना रोज गल्लीतून जाणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे.
दररोज या मलब्यामुळे होणारा त्रास, धूळ, उंचसखल रस्ता व अपघाताची शक्यता वाढल्याने स्थानिक महिलांनी रोष व्यक्त केला. “काम झाले की सर्व काही सुरळीत करणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. पण आम्हालाच त्रास सहन करावा लागतो. हा विकासाच्या नावाखालील विनाकारण त्रास आहे,” असे त्यांचे मत.
निवडणुकीच्या काळात विविध आश्वासनांचा पाऊस पडत असताना नागरिकांनी या प्रभागातील रस्ता त्वरित पूर्ववत करण्याची मागणी केली असून ठेकेदाराने तातडीने सिमेंट काँक्रेटचा रस्ता पूर्वीप्रमाणे दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.




