आरोग्यपंढरी म्हणून राज्यात विशेष ओळख असलेल्या मिरजमध्ये शासकीय आरोग्यसेवेची गुणवत्ता झपाट्याने उंचावत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला उत्तम, आधुनिक आणि सुरक्षित उपचार देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने मिरज सिव्हीलचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि तत्कालीन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या पुढाकारातून या रुग्णालयाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आकार घेण्यास सुरुवात केली आहे.
सन 2023-24 व 2024-25 मध्ये सर्जिकल मायक्रोस्कोप, ईको-कार्डिओ मशीन, लॅप्रोस्कोप, न्युरोसर्जरी मायक्रोस्कोप, फेको लेझर मशीन, डायलिसिस मशीन आदी अत्याधुनिक उपकरणांच्या खरेदीमुळे उपचारांची अचूकता आणि गती वाढली आहे. खासगी रुग्णालयांत लाखो रुपयांत होणाऱ्या सेवा, सरकारी आरोग्ययोजनांमुळे जवळपास मोफत उपलब्ध होत असल्याने ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
डायलिसिस युनिटमधून 2024-25 मध्ये 7 हजारांहून अधिक प्रक्रिया पार पडल्या. तर अपघातातील गंभीर डोक्याच्या जखमांवर मोफत न्युरोसर्जरीची सुविधा उपलब्ध होत असून 400 पेक्षा अधिक मेंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. डोळ्यांच्या जटिल सर्जरी, फेको, बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया आणि डोळे प्रत्यारोपणदेखील आता नियमितपणे होत आहेत.
लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियांमुळे शस्त्रक्रियेचा खर्च केवळ 5 ते 7 हजारांपर्यंत मर्यादित राहिला आहे. एचआयव्ही बाधितांसाठी स्वतंत्र डायलिसिस मशीन उपलब्ध करून देणे हा राज्यातील आदर्श उपक्रम मानला जात आहे. वाढत्या रुग्णभारामुळे ओपीडी संख्या दिवसाला 1000 पेक्षा अधिक झाली आहे.
राज्य शासन निधीमधून 10 मॉड्युलर ऑपरेशन थिएटरपैकी 4 कार्यान्वित झाले आहेत. मॉड्युलर आयसीयु, बर्न आयसीयु, डीएसए मशीन, मेंटल हेल्थ लॅब आदी प्रकल्पांमुळे उपचारव्यवस्था अधिक सक्षम होत आहे. तर सांगलीसाठी 500 खाटांच्या महत्त्वाकांक्षी रुग्णालयाला मान्यता मिळाल्याने जिल्ह्याच्या आरोग्यनकाशावर नवे पर्व सुरू होत आहे.
जिल्हा नियोजन निधी, शासनाचा पाठिंबा आणि प्रशासनाची दूरदृष्टी यांच्या संगमातून मिरज सिव्हील सुपर स्पेशालिटी केंद्राच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत आहे. जुन्या समजुती मोडीत काढत ‘गरजूंचे आरोग्याचे आधारस्तंभ’ म्हणून उदयास येणाऱ्या या रुग्णालयाला भविष्यासाठी शुभेच्छा.




