डफळापूर : जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि कायम चर्चेत असलेला डफळापूर पंचायत समिती गण यंदा पुन्हा एकदा लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. मागील काही वर्षांपासून लोकनेते सुनीलबापू चव्हाण यांच्या प्रभावामुळे हा गण राज्यस्तरावरही ओळखला जातो. यंदा या मतदारसंघात नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) आरक्षण असल्याने इच्छुकांची संख्या मोठी असून, सर्वच प्रमुख पक्षांकडून तगडे दावेदार मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणे अटळ मानली जात आहे.
या गणात यापूर्वी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या काळात वर्चस्व मिळवले आहे. विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांना या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळालेले असले, तरी गतवेळी पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेल्या अँड.दिग्विजय चव्हाण यांनी विजय संपादन केला होता.सध्या ते भाजपमध्ये असल्याने स्थानिक राजकीय समीकरणे आणखी बदलली आहेत. माजी मार्केट कमिटी संचालक अभिजीत चव्हाण यांच्यासह त्यांच्या भूमिकेमुळेही मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा झाल्याचे बोलले जाते.
भाजपकडील प्रमुख दावेदार
भाजपकडून उद्योजक महेश गावडे आणि अशोक सवदे ही दोन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. युवा उद्योजक आणि माजी उपसभापती देवयानी गावडे यांचे पुतणे असलेले महेश गावडे यांनी अल्पावधीत उद्योगविश्वात विश्वासार्हता निर्माण केली आहे. ‘गावडे कॉर्नर’ येथे उभारलेल्या आधुनिक शॉपिंग मॉलमुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना संधी मिळाली असून, पुणे येथेही त्यांचा उद्योग विस्तारलेला आहे. उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची क्षमता आणि विकास निधी मिळविण्याची हातोटी ही त्यांची बलस्थाने मानली जातात.
उद्योजक अशोक सवदे यांचे नाव अचानक पुढे आल्याने भाजपमधील अंतर्गत चर्चा अधिक रंगल्या आहेत. कृषी क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे कार्यरत असलेले सवदे हे शेतकऱ्यांमध्ये परिचित नाव आहे. डफळापूर, जत आणि कवठेमहांकाळ येथे त्यांच्या कृषी औषधांची दुकाने शेतकऱ्यांच्या सेवेत आहेत. धनगर समाजातून येत असल्याने सामाजिक गणितात त्यांना लाभ होऊ शकतो. राजकारणात नवखे असले, तरी शेतकरी संपर्क, सामाजिक प्रश्नांबाबतची जाण आणि साधी-सरळ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू ठरत आहे.
काँग्रेसला संधी,तगडे उमेदवार
काँग्रेसकडून बाबासाहेब माळी आणि दिपक लंगोटे हे दोन प्रमुख इच्छुक मानले जात आहेत. बाबासाहेब माळी यांनी ग्रामपंचायत सदस्य पदापासून राजकीय प्रवास सुरू केला. सध्या ते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून, भविष्यात सभापतीपदाची संधी मिळण्याचीही चर्चा आहे. माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. दीर्घकाळ राजकारणात सक्रिय, अनुभवी आणि प्रसंगी स्वतःच्या खिशातून समाजासाठी खर्च करण्याची तयारी ही त्यांची ओळख आहे.पंरतू ते निवडणूकीच्या रिंगणात उतरणार का?याकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, जिरग्याळचे माजी सरपंच दिपक लंगोटे हे युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. स्थानिक पातळीवरील कामाचा अनुभव, सर्व गावांतील नागरिकांशी थेट संपर्क आणि युवकांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे तेही सक्षम दावेदार मानले जातात. लोकांसाठी धावून जाण्याची तत्परता आणि तळागाळातील प्रश्नांची जाण ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.
आघाडीत राष्ट्रवादी(शरद पवार)गटाकडूनही तयारी
कॉग्रेस राष्ट्रवादी(शरद पवार)गट आघाडी झाल्यास डफळापूर पंचायत समिती मतदार संघ राष्ट्रवादी(शरद पवार) गटाकडे गेल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष जिल्हा बँक संचालक मन्सूर खतीब हे ऐनवेळी मैदानात उतरू शकतात.त्याचबरोबर खतीब यांचे पुतणे अँड.इर्शाद खतीब हेही राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.एक नेता एक पद अशी शक्यता झाल्यास येथे राष्ट्रवादीकडून तीसरा पर्याय पुढे येऊ शकतो.
मतदारसंघाची रचना आणि सामाजिक गणित
डफळापूर, खलाटी, मिरवाड, जिरग्याळ, शेळेकेवाडी, शिंगणापूर आणि कुडणूर ही गावे या पंचायत समिती गणात समाविष्ट आहेत. शेतीप्रधान भाग असल्याने पाणी, वीज, रस्ते, बाजारपेठ, शिक्षण आणि रोजगार हे प्रश्न कायमच केंद्रस्थानी राहिले आहेत.धनगर,मराठा समाजाचे या भागात मोठे प्राबल्य असून, इतर मागास व अल्पसंख्याक घटकांची मतेही निर्णायक ठरू शकतात.
इतर उमेदवार आणि संभाव्य बहुरंगी लढत
डाव्या विचारसरणीकडून कॉ. हणमंत कोळी हे अनेक वर्षांपासून या भागात सक्रिय आहेत. आशा वर्कर्स, बांधकाम कामगार तसेच स्थानिक प्रश्नांवर आंदोलन करून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. ते निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय अपक्ष उमेदवार किंवा तिसरी आघाडी उभी राहिल्यास लढत अधिक बहुरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार) गट सज्ज
काँग्रेस–राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी झाल्यास डफळापूर पंचायत समिती मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष व जिल्हा बँक संचालक मन्सूर खतीब हे ऐनवेळी उमेदवारी दाखल करू शकतात, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर त्यांचे पुतणे अँड. इर्शाद खतीब हेही इच्छुक मानले जात आहेत. एक नेता–एक पद धोरण लागू झाल्यास राष्ट्रवादीकडून तिसरा पर्याय पुढे येण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. आघाडीतील जागावाटपावर अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारीनंतरच स्पष्ट होणार चित्र
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे तगडे आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार असल्याने तिकीट वाटप करताना पक्ष नेतृत्वासमोर आव्हान उभे राहणार आहे. तिकीट न मिळालेल्या इच्छुकांची नाराजी कशी दूर केली जाते, यावरही अंतिम निकालाचे गणित अवलंबून असेल. सर्वच इच्छुकांची सामाजिक पकड, कामाचा अनुभव आणि स्थानिक स्वीकारार्हता पाहता, यंदाची निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरण्याची चिन्हे आहेत.एकूणच, डफळापूर पंचायत समिती गणात यंदा विकास, सामाजिक समतोल आणि स्थानिक नेतृत्व या मुद्द्यांवरच अंतिम फैसला होणार असून, मतदार कोणाला संधी देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




