दहापैकी तीन पंचायती समितीत काँग्रेसचे सभापती,शिंदे गट,राष्ट्रवादी शरद पवार २,भाजपा,राष्ट्रवादी अजित पवार,संयुक्त राष्ट्रवादी प्रत्येकी १

0
18

मिरजमध्ये भाजपला दणका 

सांगली : सांगली जिल्ह्यातील दहा पैकी तीन पंचायत समितीची सत्ता काँग्रेसने संपादन केली असून शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दोन पंचायत समितीत सत्ता संपादन केली. तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त आघाडीने प्रत्येकी एका पंचायत समितीत सत्ता पटकावली. अत्यंत उत्कठता निर्माण झालेल्या मिरज पंचायत समितीवर शिवसेना शिंदे गटाच्या मदतीने महाविकास आघाडीने सत्ता हस्तगत केली.

काँग्रेसचे आमदार डॉ.विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूस व कडेगाव या दोन तालुक्यात भाजपला पराभूत करून एकहाती पंचायत समितीची निवडणूक जिंकली होती. या दोन्ही पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी अविरोध निवडून आले. तर खानापूरमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी एकहाती पंचायत समितीची निवडणूक जिंंकली, तर आटपाडी मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याशी हातमिळवणी करत 8 पैकी पाच जागा जिंकून पंचायत समितीची सत्ता हस्तगत केली.

वाळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राखण्यात यश आले.पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ताब्यात गेली. तर तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातील कवठेमहांकाळ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे तर तासगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ताब्यात आली. आमदार रोहित पाटील यांच्या पॅनेलचा तासगावमध्ये पराभव झाला असला तरी कवठेमहांकाळ मध्ये सत्ता मिळवण्यात यश आले.

शिराळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार मानसिंगराव नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या संयुक्त आघाडीने भाजपचे विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांच्या पॅनेलला पराभूत करत पंचायत समितीची निवडणूक जिंकली होती.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत पंचायत समितीत भाजपची सत्ता आली असून या ठिकाणी त्यांनी एकहाती विजय संपादन केला आहे. केवळ जाडर बोबलाद हा गट वगळता अन्य ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते.यामुळे पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड अविरोध करण्यात कोणताही अडथळा आला नाही.

निवडून आलेले सभापती व उपसभापती असे

आटपाडी – दत्तात्रय पाटील व कल्पना पुसावळे

खानापूर- सुवर्णा भोसले व सुहास शिंदे

जत-अर्चना पाटील व रविकुमार बगली

कवठेमहांकाळ- सिंधूताई पाटील व वामन कदम

पलूस- जगन्नाथ मोरे व वैभव उगळे

कडेगाव- डॉ. जितेश कदम व डों. विजय  महाडिक

शिराळा-सम्राटसिंग नाईक व मनिषा पाटील

वाळवा- उदयसिंह पाटील व प्रकाश पाटील.

मिरज-तन्वी कमलेकर व ललिता शेजुळ

तासगाव- अरूणा पाटील व सुखदेव पाटील.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here