मुंबईतील अँटॉप हिल परिसरात २४ वर्षीय एमडीएस (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी) विद्यार्थिनी डॉ. स्तुती सोनवणे हिने ८ मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांना तिच्या खोलीतून सहा पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये प्रियकर फुजैल मोहम्मद खान (वय ३१) याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आधारे पोलिसांनी खान याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सोनवणे आणि खान यांची ओळख एका डेटिंग अॅपद्वारे झाली होती. पुढे दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मात्र या नात्यात सतत मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक आणि वाद होत असल्याचे स्तुतीने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले आहे की, प्रियकराकडून वारंवार अपमानित केल्यामुळे आणि मानसिक त्रास दिल्यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत. तसेच त्याच्या वागणुकीमुळे आपण खूप त्रस्त झाल्याचेही तिने नमूद केले आहे.
याशिवाय, रिलेशनशिपमध्ये असतानाही प्रियकराच्या मोबाईलमध्ये डेटिंग अॅप असल्याचे आणि त्याच्या सवयींमुळे आपण मानसिकदृष्ट्या खचल्याचेही तिने नमूद केले आहे. तिच्या मित्र-मैत्रिणींनाही या नात्याबद्दल चिंता असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, स्तुतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फुजैल मोहम्मद खान याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो विमा एजंट म्हणून काम करत असून लोअर परळ परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेमुळे मुंबईच्या वैद्यकीय वर्तुळात आणि समाजात मोठी खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.




