नाशिक/शिर्डी | प्रतिनिधी
महिलांचे शोषण आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली गैरकृत्ये करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता या प्रकरणाने आणखी गंभीर वळण घेतले आहे. खरात याच्या गैरकृत्यांचे व्हिडीओ उघड करणाऱ्या नीरज जाधव यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा मोठा कट रचण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, शिर्डी येथील एका कथित पीडित महिलेमार्फत नीरज जाधव विरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीतील अनेक विसंगती आणि त्रुटींमुळे हा बनाव असल्याचा संशय पोलिसांना आला. पुढील चौकशीत हा संपूर्ण कट स्वतः अशोक खरात यानेच रचल्याचे स्पष्ट होत आहे.
नीरज जाधव हा खरात याच्याच कार्यालयात काम करणारा कर्मचारी असून, १२ मार्च रोजी त्याच्याविरोधात ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल झाली होती. मात्र पोलिसांनी त्याचे मोबाईल आणि अन्य गॅजेट्स तपासल्यानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले. तपासादरम्यान भोंदूबाबाचे अनेक आक्षेपार्ह आणि धक्कादायक व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले आणि संपूर्ण रॅकेटचे धागेदोरे उलगडू लागले.
यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका अन्य महिलेने शोषणाची गंभीर तक्रार दाखल केली. तसेच गुन्हे शाखेकडून खंडणी प्रकरणाचाही समांतर तपास सुरू असल्याची माहिती आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, नीरजला अडकवण्यासाठी वापरण्यात आलेल्या महिलेच्या कुटुंबाचे आणि अशोक खरात याचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे. या आर्थिक व्यवहारांच्या धाग्यांमुळे हा कट अधिकच गंभीर बनला आहे. या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्यात आली असून, त्याच्या अटकेमुळे शिर्डी परिसरातील त्याचे कथित साथीदार आणि दलालांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास यंत्रणा या संपूर्ण रॅकेटची मुळे शोधण्याच्या तयारीत असून, आगामी काळात आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वतःचे गैरकृत्य झाकण्यासाठी एका व्यक्तीला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे, अन्यथा अशा प्रवृत्तींना आळा बसणे कठीण होईल.




