🔴
शहरातील चंदननगर परिसरात अनैतिक संबंधांच्या संशयातून एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम दिनेश मुन (वय ३५) या एका वकिलाच्या कार्यालयात सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. संबंधित वकिलाचे नाव संजय सावंत असून ते भारतीय जनता पक्ष (भाजप) कायदा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी रात्रीपासून पूनम मुन या घरी परतल्या नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यांच्या पतीने संबंधित कार्यालयात जाऊन पाहणी केली असता कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. आत प्रवेश केल्यानंतर पूनम या रक्तबंबाळ अवस्थेत पोत्यात मृतावस्थेत आढळून आल्या. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस ठाणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात समोर आले की, आरोपी स्वाती संजय सावंत (वय ४२) हिला तिच्या पतीचे पूनम मुन यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.
या संशयातून संतप्त झालेल्या स्वाती सावंत हिने पूनम मुन यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या पूनम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी स्वाती सावंत हिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.




