सांगोला : विधानसभा निवडणुकीसह विविध निवडणुकांमध्ये कधी एकमेकांना साथ, तर कधी परस्परविरोधात राजकीय भूमिका घेणारे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे सांगोला तालुक्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमस्थळी शहाजीबापू पाटील आणि दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी एकमेकांची भेट घेत हस्तांदोलन केले. त्यानंतर दोघांमध्ये काही काळ गप्पागोष्टी झाल्या. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या कानात केलेली हितगुज उपस्थितांच्या लक्षात आली. त्यामुळे या भेटीमागे नेमका कोणता राजकीय संदेश आहे, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
सांगोला तालुक्याच्या राजकारणात दोन्ही नेत्यांचे स्वतंत्र राजकीय वजन आहे. निवडणुकीच्या काळात त्यांच्या भूमिका अनेकदा वेगवेगळ्या राहिल्या आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोघेही एकाच ठिकाणी दिसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या भेटीमुळे आगामी काळात दोन्ही गटांमध्ये जवळीक वाढणार का, राजकीय पातळीवर काही नवे समीकरण आकाराला येणार का, याकडे सांगोल्याचे राजकीय वर्तुळ लक्ष देऊन आहे. सध्या या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून कोणतेही अधिकृत भाष्य झालेले नसले, तरी ‘बापू-आबा’च्या कानगोष्टींनी सांगोला राजकारणात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.




