सांगोला : सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यात आला असून, आगामी काळात राज्यातील विविध भागांत नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली. सूर्योदय अर्बन, सूर्योदय अर्बन महिला आणि एलकेपी मल्टीस्टेट या संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा सांगोला येथील सूर्योदय बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना इंगवले म्हणाले की, तिन्ही संस्थांनी मागील वर्षात मिळून सुमारे ५५० कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण केला आहे. यंदा सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट साध्य करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेत तिन्ही संस्थांच्या सभासदांसाठी १० टक्के लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला. तसेच अडीच हजार रुपयांपेक्षा अधिक शेअर्स असलेल्या सभासदांना दिवाळीत संस्थेच्या वतीने पाच किलो साखर भेट देण्याची घोषणाही करण्यात आली. या घोषणेचे सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
एलकेपी मल्टीस्टेट संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत असून सुमारे ४३ शाखांद्वारे कामकाज सुरू आहे. तर सूर्योदय अर्बन महिला संस्थेच्या सोलापूर जिल्ह्यात सुमारे १६ शाखा कार्यरत आहेत. महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र विस्तारल्यानंतर आगामी काळात या संस्थेच्या आणखी शाखा सुरू होणार असल्याचे चेअरमन अर्चनाताई इंगवले यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून, संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
प्रास्ताविकात सूर्योदय अर्बनचे माजी चेअरमन जगन्नाथ भगत यांनी बचतीचे महत्त्व सांगितले. सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. विविध शाखांमधून मोठ्या संख्येने सभासद, विशेषतः महिला भगिनी उपस्थित होत्या. उत्कृष्ट सभासद ग्राहकांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
फोटोओळ : सांगोला येथे सूर्योदय अर्बन, सूर्योदय अर्बन महिला व एलकेपी मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना संस्थापक अनिलभाऊ इंगवले. यावेळी पदाधिकारी, संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.




