शिराळा तालुक्याच्या पश्चिम टोकावर असलेल्या व सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या चारही जिल्ह्यांच्या सीमा रेषा संलग्नित असणाऱ्या चांदोली धरण तसेच अभयअरण्यात निसर्गाची विपुलता फार मोठ्या प्रमाणात आहे. शेकडो प्रकारची झाडे-झुडपे, विविध रंगांनी फुललेली फुलझाडे, सर्व प्रकारचे जंगली प्राणी यासह निसर्गाचे अनोखे व अलौकिक सौंदर्य धरण व अभयारण्यात पर्यटकांना भुरळ घालत आहे. चांदोली धरण व अभयारण्य पर्यटन करण्याकरिता महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातून वर्षाला हजारो पर्यटक चांदोली नगरीत हजेरी लावतात.महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे.
सांगली जिल्ह्यात 32 शिराळा तालुक्यात वारणा नदीवर चांदोली धरण आहे. त्याच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य आहे.सन 2004 मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात नावेतूनही जंगल फिरता येते. दुर्गवाडी उतरून पायी भटकता येते.दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो. चांदोली धरणाचा पाणीसाठा विस्तीर्ण स्वरूपाचा असून धरण ठिकाणापासून पाणी साठा जवळपास 30 किलोमीटर अंतराचा आहे. दोन डोंगरांच्या नैसर्गिक शिखरांचा वापर करून हे धरण मातीच्या स्वरूपात बनवण्यात आले आहे.
317.67 चौ.कि.मी. क्षेत्र असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्हया मध्ये येते.वारणा नदीचा उगम येथेच होतो. तसेच या अभयारण्यात 17 व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. चांदोली अभयारण्यास 2004 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला व मार्च 2007 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय उद्यानात 3 वाघांसह 25 बिबट्यांचे ठसे नुकत्याच झालेल्या प्राणिगणनेत आढळून आले आहेत.
राज्याचे मानबिंदू असणारे शेकरू व हरियाल पक्षी यांचे अस्तित्वही या पाहणीत आढळून आले आहे.चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील 317.67 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. या राष्ट्रीय उद्यानाची प्राणिगणना 2010 साली, मे महिन्यात दोन टप्प्यांत करण्यात आली.
संपूर्ण अभयारण्याची 12 खंडांत विभागणी केली आहे.प्राणिगणनेसाठी प्रत्येक खंडात एक गट याप्रमाणे प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार सर्वांचे अहवाल एकत्रित करून राष्ट्रीय उद्यान प्रशासन तात्पुरती प्राण्यांची आकडेवारी निश्चित करते. वाघ, बिबटे यांचे ठसे नागपूर येथील मुख्य कार्यालयात जमा केले जातात. त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच आकडेवारी निश्चित केली जाते. ठशांवरूनच कोणता प्राणी (वाघ की बिबट्या) नर, मादी, पिल्लू, त्यांचे वय यांची निश्चिती केली जाते. वन्य प्राण्यांच्या गणनेत, चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह 25 बिबट्यांचा वावर असल्याचे ठशांवरून निदर्शनास आले आहे, तर 350 ते 400 च्या दरम्यान गवे, 250 ते 300 च्या दरम्यान सांबरे, 100 अस्वले, यांच्यासह महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू व हरियाल पक्षी आढळून आले आहेत, तर भेकर, रानडुक्कर सर्वत्र आढळतात.
सरपटणारे विविध प्राणी, पक्षी, मोठ्या प्रमाणावर आहेत. अजगराचे प्रमाणही सर्वत्र आढळून येत आहे.तालुक्याच्या पश्चिम दिशेला चांदोली धरण अभयारण्य आहे.शिराळा शहरापासून जसजसे पश्चिम दिशेला जात जाईल तसतसे डोंगरांचे अस्तित्व नजरेस पडत जाते. पश्चिम दिशेला जात असतानाच रस्त्यामध्ये गुढे पाचगणीचा विस्तीर्ण स्वरूपाचा डोंगर नजरेस पडतो. या गुढे पाचगणीच्या डोंगरावरती शेकडो पवनचक्क्या उभारण्यात आल्या असून या पवनचक्क्यांच्या माध्यमातून पवन ऊर्जा मोठ्या प्रमाणात निर्माण केली जात आहे. आणखीन पवनचक्क्या उभारणीस मोठ्या प्रमाणावर वाव आहे. उभारण्यात आलेल्या पवनचक्क्यांच्या मुळे या परिसराला चांगले सुंदरतत्व निर्माण झाले आहे.
चांदोली धरण तसेच चांदोली अभयारण्य पर्यटनाला महाराष्ट्र शासनाकडून आणखीन मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास येथील पर्यटन विकास फार मोठ्या प्रमाणात घडून येणार आहे. पर्यटन विकासाच्या माध्यमातून शिराळा सारख्या डोंगरी तालुक्याला आर्थिक विकासाला एक चांगला पर्याय निर्माण होणार आहे. शिराळा तालुका महाराष्ट्र शासनाच्या नकाशा वरती डोंगरी तालुका असा उल्लेखीत आहे. कारण या तालुक्यातील बहुतांश क्षेत्र हे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले आहे. येथील डोंगर-दऱ्यांचा प्रदेश मोठ्या प्रमाणात असल्याने येथील अनेक लोक रोजगाराच्या निमित्ताने मुंबईस्थित झालेले आहेत.
जर महाराष्ट्र शासनाकडून चांदोली धरण व अभयारण्य पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर याठिकाणी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. मुंबईला रोजगाराच्या निमित्ताने जाणाऱ्या नागरिकांना तालुक्यातच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याकरिता येथील नागरिकांच्या कडून पर्यटन विकासाला चालना मिळावी अशी सदोदित मागणी शासनाकडे केली जात आहे.












